नागपूर : आज फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात शिवजयंती साजरी केली जात आहे. नागपूर महापालिकेतही सालाबादप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची शिवजयंती कायम स्मरणात राहील. कारण शिवजंयतीच्या निमित्तानं नवे आयुक्त तुकाराम मुंढेंनी कर्मचाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. कार्यक्रमात मुंढे बोलत असताना एका कर्मचाऱ्यचा फोन वाचला, तेव्हा त्याची खरडपट्टी काढत त्याचा मोबाईल जप्त केला. तर, जीन्स घालून आलेल्या कर्मचाऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी कामाद्वारे शिवजयंतीचं महत्व यावेळी पटवून दिलं. कामचुकारपणा करणारे, नागरिकांचं काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाचं फैलावर घेतलं.


मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी महापुरूषांच्या जयंती वा पुण्यतिथी कार्यक्रमावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना हजर राहावेच लागेल, असे परिपत्रक काढले होते. त्याचा परिणाम म्हणून सुटी असतानाही अनेक वर्षानंतर महापालिकेत महापुरूषांच्या जयंती कार्यक्रमात मनपा कर्मचारी शिस्तीने हजर होते. यावेळी मुंढे म्हणाले की, कर्त्यव्य प्रत्येक कर्मचाऱ्याने जाणून घ्या. कर्तव्यापेक्षा आपल्या भूमिका महत्वाच्या आहेत. मात्र आपण भूमिकेपासून दूर आहे. आपल्या भूमिका म्हणजे नागपूरच्या समस्या सोडवणे. नागपूर शहराचा विकास करण्यासाठी, नागरिकांना सुविधा चांगल्या मिळाव्या हे आपले कर्तव्य असावे. मात्र आपलं कर्तव्य पूर्ण होताना दिसत नाही, असं ते म्हणाले.

माझं काम फक्त सकाळी 10 ते संध्याकाळी 6 एवढेच आहे. मग आपण त्याकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहताहेत. महापालिकेचा प्रत्येक जण आपल्या विषयात कमिश्नर आहे, असे समजून काम केले पाहिजे. मात्र, आपण वेगवेगळ्या दिशेने काम करतात, असं ते म्हणाले. 1951 मध्ये महापालिकेची स्थापना झाली, एवढे वर्षानंतर ही अशी परिस्थिती असेल तर ते लांच्छनास्पद आहे, असेही ते म्हणाले.

शहराच्या विकासाची संधी आहे, तुम्ही खुर्चीच्या बाहेर पडा. बोनाफाईड चुका केल्या तर काही होणार नाही. मात्र मॅनाफाईड चुका असेल तर सर्विसमधून बाहेर पडावे लागेल. स्वाभिमानाने जगा. माणूस म्हणून जगा. आपल्या विभागात सर्वजण सवांद ठेवा. शिस्त ठेवा असं सांगताना मुंढे यांनी एक कर्मचारी जीन्स पॅन्टवर आला होता त्याला वॉर्निंग दिली. यावेळी एका कर्मचाऱ्याचा मोबाईल वाजला. त्याचा मोबाईल त्यांनी जप्त केला.