नागपूर : 'शिवाजीचे उदात्तीकरण - पडद्यामागचे वास्तव' या वादग्रस्त पुस्तकावर त्यातील मजकुरामुळे बंदी लावण्याची मागणी केली जात आहे.मात्र, या पुस्तकाचे लेखक विनोद अनाव्रत सध्या कुणालाही भेटत नाहीत. एबीपी माझाने आज दिवसभरात त्यांना भेटण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी ते भेटणार नाही असेच सांगितले.


लेखकाच्या घराची वैशिष्ट्यं
या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक विनोद अनाव्रत राहत असलेले नागपुरातील नाईकनगर परिसरातले घर लक्ष वेधून घेणारे आहे. कारण स्वराज्याची भगवा पताका महाराष्ट्रात सर्वदूर पसरविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर अत्यंत जहाल आणि खालच्या भाषेत टीका करणाऱ्या या लेखकाचे घर गडद भगव्या रंगाने रंगवलेले आहे. घराच्या बाहेरील भिंतींना भडकपणे भगवा रंग देण्यात आला आहे. शिवाय घराच्या दर्शनी भागावरील अनेक चिन्हे ही भगव्या रंगात रंगवलेले आहेत. घराच्या अंगणातील पोर्च, घरासमोरील लोखंडी गेट सर्व काही भगव्या रंगाचा आहे. घरासमोरच्या अंगणात ही भगव्या रंगाची फुले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भगवी पताका फडकावणाऱ्या महाराजांवर पुस्तकातून जहरी टीका करणारा लेखक त्याच्या घरावर असे भगवे रंग का ठेवत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुस्तकात काय आहे -
ज्या 180 पानी पुस्तकावरून सध्या वाद निर्माण झाले आहे. त्या पुस्तकात अनेक वादग्रस्त प्रकरणं लेखकाने समाविष्ट केलेली आहेत. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 6 मे 2011 रोजी म्हणजेच आजपासून 9 वर्षांपूर्वी प्रकाशित झाली असली तरी आजवर त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. पुस्तकात एकूण पाच प्रकरणे आहेत. तर प्रत्येक प्रकरणात अनेक वादग्रस्त उपलेख आहेत. त्यातील काही लेखांचे मथळे पुढील प्रमाणे - शिवाजीच्या महानतेचा बागुलबुवा, शिवाजी महान राजा होता म्हणजेच नेमके काय?, शिवाजीचं फुगा कोणी फुगवला?, हिंदू शब्दरूपी बाटलीत शिवाजी नावाची दारू, शिवाजींचा गांधी कोणी व का केला? रयतेचा खरा राजा कोण? शिवाजी की औरंगजेब?, औरंगजेब हिंदू द्वेषी शासक होता का?, ब्राम्हण आणि मराठ्यांच्या मानधरणीत अडकलेला कुणबी

विनायक मेटेंचा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

या पुस्तकाचे प्रयोजन काय -
पुस्तकाच्या पहिल्याच पानावर ते लिहिण्याचे प्रयोजन काय असे सांगताना लेखकाने शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या पद्धतीने शिकविला जातो तो वास्तववादी नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे बालमनावर स्वतःच्या धर्माबद्दल गर्व बाळगून मुस्लिम द्वेषाचे बीजारोपण केले जाते. ही चुकीची वैचारिक जडणघडण केली जात असून त्यामुळे भारतीयांच्या मनात बालपणापासूनच विष पेरले जात आहेत. लोकांना त्याची जाणीव होईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे हे पुस्तक लिहीत असल्याचे लेखकाने म्हटले आहे.

मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचं भाजप कार्यालयात प्रकाशन, शिवभक्तांमध्ये रोष

भाजपने केली तक्रार दाखल

या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी भाजपने केलीय. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. पुस्तकाचे लेखक डॉ. विनोद अनाव्रत आणि पुस्तकाचे प्रकाशक पुण्याचे सुगावा प्रकाशन संस्थेच्या मालका विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील भाजपने केली आहे. भाजपचे राज्य प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केलीय. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडे तिथल्या भाजप कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तक्रार ही दिली आहे.

शिवरायांचा पुतळा हटवला तिथेच पुन्हा स्मारक; मुख्यमंत्री कमलनाथ स्वत: हजर राहणार

या पुस्तकातील प्रत्येक पानावर छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याचं लेखी तक्ररीत म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यासाठी भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीच्या पूर्वी पुस्तकावर बंदीची मागणी केली आहे. शिवाय भाजपच्या अमरावतीच्या कार्यकर्त्यांनी आज तिथल्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार देत पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांवर लवकरच हॉलिवूडपट | ABP Majha