नागपूरच्या पूर्व टोकावर भांडेवाडी परिसरात असलेल्या डम्पिंग यार्डमध्ये आज सकाळी अचानक फायर ब्रँड अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी भेट दिली. नागपुरात स्वच्छतेचे काम किती प्रामाणिक पणे होते आणि कचरा व्यवस्थापन बाबतीत नागपूर महापालिकेचे अधिकारी किती दक्ष आहेत हे त्यांना पाहयचे होते. मग काय डम्पिंग यार्डमध्ये पाऊल ठेवताच मुंढे यांनी त्यांची कार थेट कचऱ्याच्या डोंगरावर चढविली. त्यांची ही पाहणी एखाद्या कचऱ्याच्या डोंगराला लांबून पाहत बसणे इथपर्यंत मर्यादित नाही हे स्पष्ट झालं. कचऱ्याच्या डोंगरावर चढताच चाणाक्ष मुंढे यांना कचरा व्यवस्थपनाच्या बाबतीत अधिकारी जे सांगतात आणि प्रत्यक्षात जी स्थिती आहे, त्यात जमीन अस्मानचं अंतर असल्याचे लक्षात आले.
तुकाराम मुंढे यांच्या प्रश्नांवर अधिकारी अनुत्तरीत -
कचऱ्याच्या डोंगरावर रेग पिकर्स महणजेच कचरा वेचणारे पाहून मुंढे यांनी हे इथं कसे काय विचारले. कारण, नागपूर मनपाच्या अधिकाऱ्यांचा दावा होता की कचरा वेचणाऱ्यांना डम्पिंग यार्डमध्ये वेगळी जागा दिलेली आहे. मात्र, तरीही कचरा वेचणारे धोकादायक पद्धतीने कचऱ्याच्या डोंगरावर चढून कचरा वेचत आहेत. हे पाहून मुंढे यांनी तिथेच अधिकाऱ्यांचा क्लास घेतला. त्यानंतर मुंढे कचऱ्याच्या पुढच्या मोठ्या डोंगरावर चढले. तिथे त्यांच्या नजरेस मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक दिसून आले. शहरात सिंगल युज प्लास्टिकवर बंदी असताना एवढे प्लास्टिक कसे काय येत आहे? मुंढे यांच्या या प्रश्नावर अधिकाऱ्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही.
मुंढेंच्या बदलीनंतर फटाके फोडणाऱ्या नाशिकच्या महापौर अडचणीत
तिथून पुढे गेलेल्या मुंढे यांनी डम्पिंग यार्ड मधून कचऱ्यातून तयार होणाऱ्या बाय प्रॉडक्ट्सची माहिती घेतली. कंपोस्ट खताची प्रक्रिया समजून घेतली. तेवढ्या एका महिला अधिकाऱ्याने आरडीएफ म्हणजेच रिसायकल्ड ड्राय फ्युलसाठी कंत्राटदार किती रुपये घेतो याचे सत्य मुंढे यांच्या लक्षात आणून दिले. पुण्यात 300 रुपये प्रति टन दर दिले जात असताना नागपुरात प्रति टन 1 हजार रुपयांचा दर असल्याची माहिती मुंढे यांच्या लक्षात आणून दिली. मुंढे यांनी इतर अधिकाऱ्यांना त्यामागचे कारण विचारले. मात्र, अधिकारी त्याबद्दल उत्तर देऊ शकले नाही. मग मुंढे यांनी ते पैसे बनवतायेत असे शब्द उच्चारुन कचऱ्यात कोणते खेळ सुरू आहे, हे स्पष्ट केले.
नागपूर महापालिकेत अनेक कामांसाठी खासगी कंपन्यांना कंत्राटं दिलेली आहेत. कचरा व्यवस्थापनाचा मोठा भाग खासगी कंपन्या सांभाळत आहेत. मात्र, त्यांना जनतेच्या करातून पैसे दिले जातात. त्यामुळे जर जनतेच्या करातून एक दमडीही खासगी कंत्राटदारांचे खिशे भरण्यासाठी वापरली जात असेल तर तुकाराम मुंढे त्यावर लगाम लावतील हीच नागपूरकरांची अपेक्षा आहे.
Commissioner तुकाराम मुंढेंची डम्पिंग ग्राऊंडला अचानक भेट, कामगारांचा गोंधळ | ABP Majha