नाशिक : नाव तुकाराम मुंढे... 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी.. सोलापूर जिल्हाधिकारी 18 महिने, नवी मुंबई महापालिका आयुक्त - 10 महिने, पुणे पीएमपीएमएल अध्यक्ष 11 महिने, 7 महिन्यांपासून नाशिक महापालिका आयुक्त... जिथे जाऊ तिथे राडा... विरोध.. वाद... हे फक्त तुकाराम मुंढेंविरोधातच का घडतंय असा प्रश्न उपस्थित होतोय.
नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुकाराम मुंढेंकडे महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली. मात्र मुख्यमंत्र्यांना ज्यांच्या कर्तव्यनिष्ठतेवर विश्वास आहे, तो विश्वास नाशिक महापालिकेतील भाजप नगरसेवकांना नाही. म्हणूनच भाजपने मुढेंविरोधात अविश्वस ठराव आणत थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलंय.
अविश्वास ठराव कशामुळे?
अविश्वास ठराव मांडण्यासाठी नगर सचिवांना 15 सदस्यांच्या स्वाक्षरीचं पत्र दिलं आहे. महापौर रंजना भानसी यांनी आयुक्तांवर मनमानी आणि हुकूमशाही पध्दतीने काम करत असल्याचा आरोप केला आहे. अवास्तव करवाढ यावरून आयुक्तांवर सर्व नाराज असल्याचं महापौरांचं म्हणणं आहे. लवकरच सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावून विशेष महासभा बोलावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
तुकाराम मुंढेंनी आरोप फेटाळले
तुकाराम मुंढेंनी मात्र महापौरांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ''कायदा आणि लोकांचं हित यानुसारच मी आतापर्यंत काम केलं आहे. कायद्यानुसारच मी निर्णय घेतो आणि अंमलबजावणी करतो. कदाचित असं असेल की यापूर्वी कायद्याची प्रक्रिया न राबवताच कामाची सवय लागली असेल म्हणून मनमानी वाटत असावं,'' असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलं आहे.
नियुक्ती... वाद आणि बदली
नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली सीईओ म्हणून नियुक्ती, त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं.
सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं.
नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.
नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली.
पुण्यातून नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. नाशिकमध्ये गेल्यावर त्यांनी केलेली करवाढ अवास्तव असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला. या वादाचं रुपांतर आता अविश्वास ठराव आणण्यामागे झालं आहे.
आपल्याकडच्या व्यवस्थेत जबरदस्ती बदल घडणं कठिण आहे. त्यासाठी इतरांच्या कलेने थोडं झुकावंही लागतं. तुकाराम मुंढे नियमाला धरून काम करतात, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध अधिकारी आहेत. मात्र असाच जर विरोधी आणि नाराजीचा सूर आळवू लागला, तर बदल घडवणं दूरच, परिस्थिती आहे त्यापेक्षा वाईट होऊ शकते.
स्पेशल रिपोर्ट : हे फक्त तुकाराम मुंढेंच्या बाबतीतच का?
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
28 Aug 2018 11:00 AM (IST)
मुख्यमंत्र्यांना ज्यांच्या कर्तव्यनिष्ठेवर विश्वास आहे, तो विश्वास नाशिक महापालिकेतील भाजप नगरसेवकांना नाही. म्हणूनच भाजपने मुढेंविरोधात अविश्वस ठराव आणत थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -