नागपूरकरांसाठी शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, मेट्रो मार्गिका टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता
Nagpur Metro: नागपूरमध्ये 43.80 किमी अंतराची मार्गिका उभारण्यात येणार आहे.या प्रकल्पाकरता 6 हजार 708 कोटी रुपयांचा सुधारित खर्च येणार आहे.
नागपूर : नागपूरकरांसाठी शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरातील मेट्रो (Nagpur Metro) रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे नागपूरमध्ये 43.80 किमी अंतराची मार्गिका उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पाकरता 6 हजार 708 कोटी रुपयांचा सुधारित खर्च येणार आहे. या मध्ये मार्गिका क्रमांक 1 -ए मिहान ते एमआयडीसी ईएसआर ( 18.65 किमी.) मार्गिका क्रमांक 2- ए ऑटोमेटीव्ह चौक ते कन्हान नदी (13 किमी). मार्गिका क्रमांक 3ए लोकमान्य नगर ते हिंगणा (6.65 किमी). मार्गिका क्रमांक 3-ए – प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर (5.50 किमी) असे मेट्रो मार्ग असणार आहेत. जानेवारी 2014 मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा एक प्रकल्प राबवण्यास सुरूवात झाली होती. यामध्ये 40.02 किमी लांबीचा मेट्रो मार्ग आणि 32 स्थानके उभारण्यात आली. या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले आहे. हा प्रकल्प महत्त्वाचा असून नागपूरकरांना याचा टप्प्याचा फायदा होणार आहे.
मागील वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या प्रकल्पासाठी 5 हजार 973 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. नागपूरची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या आवश्यकतेचा विचार करून शहरातील मेट्रो वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणाऱ्या मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील 48.29 किलोमीटरच्या मार्गास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली. मेट्रोचा दुसरा टप्पा 43.8 किमीचा असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी 82 किमी असणार आहे.
कामठी मोठे शहर असून हजारो रहिवासी नोकरी आणि शिक्षणासाठी नागपूरला येतात. मेट्रोचा वापर करून नागपूरच्या कानाकोपऱ्यात जलद पोहोचू शकणार आहे. बुटीबोरी एमआयडीसी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. येथे सुमारे 750 युनिट्स असून सुमारे 50,000 लोकांना रोजगार मिळत आहे. या नागरिकांना कारखान्यांपर्यंत जलद प्रवासाची सुविधा होणार आहे.