नागपूर : राम झुला उड्डाणपूल अपघातप्रकरणातील प्रमुख आरोपी रितिका मालू यांनी आत्मसमर्पण केले आहे. अपघात झाल्यानंतर त्या फरार होत्या. अपघाताची ही घटना 25 फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. रितिका मालू व त्यांची मैत्रीण सीपी क्लबमध्ये गेल्या होत्या. तिथून दोघी मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान मर्सिडीज कारने घरी परतत असताना हा अपघात झाला होता. घरी परतताना रितू यांनी रामझुल्यावर कारचा वेग वाढविला आणि समोर दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली होती. यात मोहम्मद हुसेन व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची नंतर राज्यभर चर्चा झाली होती.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
याप्रकरणी तहसील पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून रितू यांना अटक केली होती. त्या नंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर तेव्हा न्यायालयाने रितू मालू यांना अंतरिम जामीन दिला होता. पुढे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच आरोपी महिला चालकाच्या वैद्यकीय चाचणीच्या आधारावर पोलिसांनी अपघाताचा सखोल तपास करत रितू मालू यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र अटक टाळण्यासाठी रितू मालू यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता.
एवढे दिवस मी माहेरीच होते
न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर रितिका मालू फरार झाल्या होत्या आणि तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. काल रितिका मालू यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. एवढे दिवस मी माहेरीच होते असं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान त्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांना या प्रकरणाचा अधिक तपास करणे सोपे होणार आहे.
16 जून रोजी अपघाताचा थरार, दोघांचा मृत्यू
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपूरममध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा (Nagpur Accident) धक्कादायक प्रकार पुढे आला. या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले होते. 16 जून रोजी रात्री ही घटना घडली होती. मृतकांमध्ये एका बालकाचादेखील समावेश आहे. ही घटना रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
Nashik Crime : शेअर ट्रेडिंगचं आमिष भोवलं, टेलिग्रामवरून नाशिकच्या चौघांना तब्बल 95 लाखांचा गंडा
सरपंचावर गोळ्या झाडून हत्या, राजकारणाची किनार; बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा का उडाला?