Beed Parli Firing : बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून रोज घडणाऱ्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्णतः बोजवारा उडाला आहे का असा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हे प्रकरण पैशाच्या व्यवहारातून झाले असल्याचे पोलिस सांगत असले तरी याला राजकीय रंग असल्याची चर्चा आहे.
वेळ रात्रीची सव्वा आठ वाजता, ठिकाण परळी शहरातील बँक कॉलनीमधील परिसर. फारशी रहदारी नसलेल्या या भागात लोक घरामध्ये असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज झाला आणि याच गोळीबारामध्ये एक जण जागीच कोसळला. त्यांचं नाव होतं बापू आंधळे (Bapu Andhale Beed) . परळी शहरापासून जवळ असलेल्या मरळवाडी या गावचे सरपंच. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बापू आंधळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राजकारणातील वादातून गोळीबार
असं असलं तरी या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे. बापू आंधळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते (Baban Gite Beed) यांच्या पॅनल मधून ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि निवडणुकीनंतर अजित पवार गटात प्रवेश करत धनंजय मुंडे यांची साथ दिली. पैशाच्या व्यवहारातून या दोन गटात गोळीबार झाला असला तरी या ठिकाणी धनंजय मुंडे गट आणि बबन गीते गट असाच हा वाद होता. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी या गोळीबाराततील आरोपी आणि तक्रारदार हे सगळेजण एकत्रितच काम करत होते.
बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा
या घटनेमध्ये जे दोघेजण जखमी आहेत त्यातील ग्यानबा गीते आणि महादेव गीते या दोघांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. एका रहदारी असलेल्या कॉलनीमध्ये झालेला हा गोळीबाराचा प्रकार इतका भयंकर होता की मृत झालेल्या बापू आंधळे यांच्या शरीरामध्ये दोन गोळ्या घातल्या होत्या. तर जखमी झालेल्या महादेव गीते यांच्या पोटामध्ये असलेली गोळी पहाटे काढली गेली. याचा अर्थ परळीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
बीड पोलिसांना प्रश्न
या गोळीबारच्या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भाने समोर आलेले प्रश्न सुद्धा तितकेच गंभीर आहेत.
या गोळीबारामध्ये गोळीबार करणारे आणि ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल होते. तर मग त्यांच्याकडे जे पिस्तूल आले त्या पिस्तूलला परवाना होता का?
पोलिस रेकॉर्डला ज्या पैशाच्या व्यवहाराची नोंद झाली तो व्यवहार नेमका किती रुपयांचा होता?
या ठिकाणी एकूण किती जणांजवळ पिस्तूल होते आणि कोणत्या पिस्तूलमधून किती बुलेट्स फायर झाल्या?
रहदारी वस्तीमध्ये झालेल्या या गोळीबार प्रकरणात एकूण किती जण सामील होते?
पोलिसांच्या रेकॉर्डप्रमाणे पैशाच्या व्यवहारातून हा गोळीबाराचा प्रकार घडला असला तरी यामागे काही राजकीय संघर्ष आहे का?
ही बातमी वाचा: