Mahajyoti Fellowship: मोठी बातमी! महाज्योती पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार
Nagpur: बार्टी,सारथी,महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पीएच.डी. फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या महाज्योती पीएचडी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब नागपुरात उघडकीस आली आहे.
![Mahajyoti Fellowship: मोठी बातमी! महाज्योती पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार nagpur mahajyoti phd fellowship examination 2023 paper leak confusion among examinees maharashtra news Mahajyoti Fellowship: मोठी बातमी! महाज्योती पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/10/de2e9662e04867bc93d4be4d681c98a31704869858751892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर: बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. (PhD) फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या महाज्योती (Mahajyoti) पीएचडी (PhD) परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब नागपुरात उघडकीस आली आहे. नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयातील सेंटरवर हा प्रकार घडला आहे. या पेपरफुटीवर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. महाज्योती पीएचडी फेलोशिपच्या पेपरमधील 4 पैकी 2 सेटला सील नसल्याने हा पेपर लीक आसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सलग तिसऱ्यांदा या परीक्षेत गोंधळ झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शासनाविरुद्ध प्रचंड रोष आहे. शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार
बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पीएच.डी. फेलोशिपसाठी आज, बुधवारी राज्यातील 4 प्रमुख केंद्रांवर पात्रता परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षा केंद्रांवर महाज्योती पीएचडी फेलोशिप परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चार सेट पैकी 2 सेट हे लीक असून ते झेरॉक्स कॉपी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. A आणि B सेट हे सीलबंद असून उर्वरित C आणि D हे लीक आहेत. शिवाय त्यांना स्टेपलर केलेल्या पिन आढळून आल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर झेरॉक्स कॉपी देण्यात आले असून हे पेपेर फुटलेले आहेत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, या पेपरफुटीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. सर्व विद्यार्थी कमला नेहरू महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये उभे राहून आंदोलन करत आहेत.
'सरसकट फेलोशिप द्या'
नोटिफिकेशनमध्ये अशा स्पष्ट सूचना आहेत की, परीक्षा केंद्रांवर देण्यात येणारा पेपर हा विद्यार्थ्यांसमक्ष तपासून पळताळणी करून घ्यावी. समाजा तो पेपर सेट लिक अथवा आधीच खुला असेल, तर तो स्वीकारू नये, असे स्पष्टपणे नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. मात्र विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पेपरमधील A आणि B सेट हे सीलबंद असून उर्वरित C आणि D हे लीक आहेत, त्यावरून शंका उपस्थित झाली. या पूर्वीदेखील सेट विभागाचा गलथान कारभार अनेकदा चव्हाट्यावर आला आहे, त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांसोबत खेळ खेळला जात आहे का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येत असतात. शासन जर वारंवार अशा चुका करत असेल, तर यावरून ते किती गंभीर आहेत हे लक्ष्यात येतं. आम्ही या परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे आणि शासनाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी आग्रही मागणी आता विद्यार्थ्यांच्या वतीने जोर धरु लागली आहे.
पुण्यात देखील घडला असाच प्रकार
पुण्याच्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर देखील असाच प्रकार घडला आहे. या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले आहे. पेपर फुटल्याचे लक्षात येताच परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला आहे. परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पडसाद
नागपुर आणि पुण्यात पेपरफुटीची घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याचेच पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्येही उमटले आहेत. देवगिरी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. काही विद्यार्थी त्यांच्या चिमुकल्या मुलांसोबतही येथे उपस्थित आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)