Nagpur : 'एक आंदोलक अशीही'...बाजार बंद पाडायला आली आणि सौंदर्यप्रसाधनं खरेदी करुन गेली
'ती' बाजारात आली होती तीन कृषी कायद्याविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाच्या माध्यमातून बाजार बंद करण्यासाठी. मात्र ऐनवेळी 'ती'चं सौंदर्यप्रसाधनांसाठीचं प्रेम उफाळून आलं.
नागपूर : महिला आणि सौंदर्य प्रसाधनांची खरेदी हे एक वेगळंच समीकरण असतं. त्यासाठी वेळ, काळ, स्थान हे फारसं महत्त्वाचं नसते. नागपुरातील सीताबर्डी बाजारपेठेत सौंदर्यप्रसाधनांसाठी अशाच एका दर्दी महिलेची ही कहानी. 'ती' बाजारात आली होती तीन कृषी कायद्याविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाच्या माध्यमातून बाजार बंद करण्यासाठी. मात्र ऐनवेळी 'ती'चा सौंदर्यप्रसाधनांसाठीचं प्रेम उफाळून आलं.
केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात सोमवारी संयुक्त किसान मोर्चा तर्फे भारत बंदची हाक देण्यात आली होती. संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष यासह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. नागपूरच्या सीताबर्डी बाजारपेठेजवळील व्हरायटी चौकात सोमवारी सकाळी 11 वाजता संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी, विविध डाव्या संघटनांचे कार्यकर्ते आणि भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा झाले होते.
व्हरायटी चौकात बराच वेळ केंद्रातील मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन सीताबर्डी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर आले. व्यापारांनी भारत बंदला पाठिंबा देत आपापली दुकानं, व्यापारी प्रतिष्ठान बंद करावी आणि शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा द्यावा असे आग्रह करण्यात आले.
संयुक्त किसान मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते एका समूहात हळूहळू पुढे चालले गेले. मात्र, राजकारणात नेहमीच आपलं वेगळेपण जपणार्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या सर्व पक्षांच्या नंतर काहीसं अंतर ठेवून आपला एक छोटेखानी मोर्चा वेगळा काढला. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या या मोर्चात अनेक महिला कार्यकर्त्याही होत्या.
सीताबर्डीच्या बाजारपेठेत प्रामुख्याने रेडिमेड कापड, सौंदर्यप्रसाधन, पर्स, बॅग्स अशा फॅशनेबल वस्तूंची दुकानं आहेत. आम आदमी पक्षाचे सर्व पुरुष कार्यकर्ते हे सर्व दुकानं बंद पाडत असताना पक्षाच्या काही महिला कार्यकर्त्याना आपण बाजारपेठ बंद पाडायला आलो आहो याचा विसरच पडला आणि सौंदर्यप्रसाधनांसाठीचा महिलांचा निसर्गदत्त प्रेम उफाळून आलं. मग काय, दोन महिला कार्यकर्त्यांनी सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानावर जाऊन ती दुकान संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंद करावी असा आग्रह धरण्याऐवजी तिथे असलेल्या सौंदर्यप्रसाधनांची पाहणी सुरु केली. एका महिलेने आपण भारत बंदमध्ये दुकान बंद करायला आलो आहे हे विसरून चक्क लिपिस्टिकची खरेदीही केली. तिचं हं सौंदर्यप्रसाधनबद्दलचं प्रेम लांबून एक कॅमेरा टिपत आहे, हे दुसऱ्या कार्यकर्तीच्या लक्षात आल्यानंतर तिने लिपस्टिक खरेदी करणाऱ्या महिलेला सावध ही केलं. मात्र, त्या कार्यकर्तीचा लिपस्टिक बद्दलचं प्रेम हे जास्तच होतं. म्हणूनच की काय तिने आपली खरेदी पूर्ण केली आणि त्यानंतर दोघीही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मोर्चात सहभागी होऊन मोदी सरकार विरोधात घोषणा देत पुढे निघाल्या.
महत्वाच्या बातम्या ;