Arvind Kejriwal : आम्हाला दंगली घडवता येत नाहीत, पण शाळा आणि हॉस्पिटल बांधता येतात: अरविंद केजरीवाल
Nagpur : सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर देशाला वाचवण्यासाठी आपण राजकारणात आलो असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटलंय.
नागपूर: आम्हाला चोरी आणि भ्रष्टाचार करायला येत नाही, गुंडगिरी करता येत नाही, तसेच दंगली घडवता येत नाही, पण शाळा आणि हॉस्पिटल्स बांधता येतात असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं. ते नागपूरमध्ये 'लोकमत' वृत्तपत्राच्या सुवर्ण जयंती कार्यक्रमात बोलत होते.
देशात एक पक्ष असा आहे जो कुठेही दंगल घडो, त्यातील गुंडांना आणि लफंग्यांना पक्षामध्ये सामिल करुन घेतो. जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर त्यांच्योसोबत जा, जर शाळा आणि हॉस्पिटल्स हवे असतील तर आमच्यासोबत या असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "2024 सालची लोकसभा निवडणूक जिंकणे हे आमचं लक्ष्य नाही, आमचं लक्ष्य हे देश आहे. आम्ही आमचे करिअर करण्यासाठी आलो नाही तर करिअर सोडून आलो आहोत. भारत मातेसाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर देशाला वाचवण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत."
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, "मी देवाकडे दोन गोष्टी मागतो. एक म्हणजे भारत नेहमी जगातील पहिल्या क्रमांकाचा देश राहो. दुसरं म्हणजे जोपर्यंत भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनत नाही तोपर्यंत मला मृत्यू मिळू नये. मला राजकारण नव्हे तर काम करायला येतं. आम्हाला चोरी करता येत नाही, भ्रष्टाचार करता येत नाही. गुंडगिरी करता येत नाही, दंगली घडवता येत नाहीत. पण आम्हाला शाळा आणि रुग्णालये बांधता येतात."
महाराष्ट्रात सरकारी शाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे असं सांगत अरविंद केजरीवाल म्हणाले की, "सुरुवातीला दिल्लीमध्ये शाळांची हीच स्थिती होती, आता ही स्थिती बदलली आहे. सरकारी शाळांतील बारावीतील निकाल हा 97 टक्के इतका आहे. सुमारे चार लाख विद्यार्थी हे खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये आले आहेत."
'लोकमत' वृत्तपत्राच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण जयंती वर्षाच्या निमित्त आज नागपूरमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उपस्थिती लावली. "2024 च्या लोकसभा निवडणुका आणि आम आदमी पक्षाची भूमिका" या विषयावर केजरीवाल यांनी संबोधन केलं.
नागपूरच्या भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमात 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल आम आदमी पक्षाची भूमिका आणि धोरण या संदर्भात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होतं. याच कार्यक्रमात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी "नया पंजाब" या विषयावर संबोधन केलं.