(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhavna Gawali : आम्हाला गद्दार म्हटलं जातं, पण शिवसेना आमच्या बापानं उभी केली; भावना गवळींचा उद्धव ठाकरेंना टोला
Bhavna Gawali : "ही लोकं आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र, शिवसेना कोणाच्या बापाची नाही. आम्ही वर्षानुवर्षे काम करून शिवसेना वाढविली आहे, असं वक्तव्य शिवसेनेच्या बंडखोर खासदार भावना गवळी यांनी केलंय.
Bhavna Gawali : आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे, परंतु, आम्ही शिवसेना (Shiv Sena) सोडलेली नाही. आमच्या बापानं ही शिवसेना उभी केली आहे, असं वक्तव्य शिवसेनेच्या बंडखोर खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) यांनी केलंय. भावना गवळी यांनी आज त्यांच्या वाशिम या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांच्यावर जोरदार टीका केली. भावना गवळी यांनी जाहीर सभा घेत यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
"ही लोकं आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र, शिवसेना कोणाच्या बापाची नाही. आम्ही वर्षानुवर्षे काम करून शिवसेना वाढविली आहे. 40 आमदार आणि 12 खासदार का सोडून गेले, याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला यावेळी भावना गवळी यांनी उद्धव ठारे यांना लगावला.
भावना गवळी म्हणाल्या, या मतदारसंघात पुन्हा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ दिली. देवेंद्र फडणवीस ही त्यांच्या सोबत होते. अडचणीच्या काळात ज्यांनी मदत केली नाही, त्यांना आठवू इच्छित नाही. मात्र अडचणीत असताना ज्यांनी मदत केली त्यांची साथ कधीच सोडणार नाही. 25 वर्षात अनेक विकास कामे केली, मात्र अजून ही अनेक कामे शिल्लक आहेत. पिण्याच्या पाण्याच्या योजनेची उंची वाढविण्याची गरज आहे, विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याची गरज आहे.
पीक विमा कंपन्यांना इशारा
पीक विमा कंपन्यांना आपण पाहून घेऊ, त्यांनी आपल्याला चांगला मोबदला दिला नाही तर आपण रस्त्यावर उतरू, भावना गवळी तुमच्या खांद्याला खांदा लाऊन लढेल, असा विश्वास भावना गवळी यांनी जनतेला दिला.
दरम्यान, तब्बल वर्षभरानंतर भावना गवळी आज त्यांच्या वाशिम या मतदारसंघात आल्या होत्या. त्यांच्या शक्तिप्रदर्शनाच्या आधी एबीपी माझाने भावना गवळी यांच्याशी बातचीत केली. यावेळी देखील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "माझ्या नाही त्यांच्या विचारात फरक पडला. आम्हाला दूर केलं नसतं तर 12 खासदार आणि 40 आमदार दूर गेले नसते. चुकलं कोण याचं आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे," अशा शब्दात भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या