Startup Nagpur : जिल्ह्यात महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा 17 ते 26 ऑगस्ट दरम्यान
नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तंत्र मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे, जिल्ह्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे, असे वैशिष्ट आहे.
नागपूर: महाराष्ट्र राज्यात नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 अंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नागपूर जिल्ह्यात स्टार्टॲप आणि नाविन्यता यात्रेची सुरुवात होणार आहे. या यात्रेमध्ये प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय औद्योगिक संस्था, लोकसमूह एकत्रीत होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी 17 ते 26 ऑगस्ट 2022 पर्यंत एक वाहन (मोबाईल व्हॅन) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फिरविण्यात येईल. वाहनासोबत असलेल्या प्रतिनिधीद्वारे नागरिकांना या यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नाविण्यता संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबविले जाणारे विविध उपक्रमांबाबत माहिती देण्यात येणार आहे.
नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांना नोंदणी करुन यात्रेच्या पुढील टप्याबाबत माहिती देखील पूरविण्यात येईल. ही यात्रा जिल्ह्यातील तळागळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तंत्र मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे, जिल्ह्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे, असे वैशिष्ट आहे. ज्या उमेदवारांनी नाविन्यपूर्ण असे उपक्रम केलेले आहे किंवा उपक्रम करण्यास इच्छुक आहेत, अशा उमेदवारांना त्यांचे कौशल्यप्रदर्शन करण्याची एक चांगली संधी यात्रेद्वारे मिळणार आहे. तरी याबाबत स्थानिक नागपूर येथे प्रशिक्षण सत्राचे तसेच सादरीकरण सत्राचे आयोजन दि. 15 ते 16 सप्टेंबर, 2022 असे दोन दिवस करण्यात येणार असून यावेळी गरजू उमेदवारांना तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अधिक माहितीकरिता
नागपूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचा (कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये, यांचा देखील) या शासनाचे उपक्रमात सहभाग राहणार आहे, अधिकाधिक उमेदवारांनी या स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा स्वतचा व्यवसाय सुरु करण्यासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, तथा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष आर. विमला यांनी केलेले आहे. उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे msins.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, तसेच स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनक केंद्र, नागपूर (0712-2531213) यांचेशी संपर्क साधावा.