Nagpur News पुरामुळे नागपुरात मोठं नुकसान; गडकरी, फडणवीसांनी घेतली आढावा बैठक
Devendra Fadanvis On Nagpur Rain : नागपुरातील पुरामुळे मोठं नुकसान झालं यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नागपूर : नागपूरच्या (Nagpur) पुरामुळे ज्यांचं नुकसान झालं त्यांना तातडीने दहा हजार रुपायांची मदत करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. तर ज्यांच्या दुकानांचे नुकसान झाले त्याचे तात्काळ पंचनामे करुन 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात निर्माण झालेल्या पुरस्थितीसंदर्भात एक आढावा बैठक देखील घेतली. या बैठकीमध्ये सर्व प्रशासकिय अधिकारी देखील उपस्थित होते.
नाग नदी परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात महापुराचं संकटं ओढावलं. तर यामध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. पण अजून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'अगदी कमी वेळामध्ये 109 मिमी पाऊस झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन नाग नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. या पुरामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं.'
'आतापर्यंत यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जनावरं या पुरामुळे दगावली आहेत. तसेच नाग नदीच्या भिंती देखील कोसळल्यात. साधारणपणे दहा हजार घरांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांना तातडीने दहा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर महानगरपालिकेकडून गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. यासाठी महानगरपालिकेला जो काही निधी लागेल तो शासनाकडून करण्यात येईल,' असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'अंबाझरी तलावामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी करुन सुरक्षा भिंतीचे काम करण्यात येईल. तर शनिवार रात्रीसाठी देखील नागपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व बचाव पथकं तैनात ठेवण्यात आली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास चाळीस धोकादायक ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. सर्व ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.'
'प्रशासनाकडून तातडीने बचाव कार्य राबवण्यात आले. यामुळे साडे तीनशे पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात आले आहे. 25 वर्षांमध्ये एकदा असा पाऊस होतो. पण तरीही पुन्हा अशी स्थिती निर्माण होणार नाही, अशा काही कायमस्वरुपी योजना केल्या जातील,' असं उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
Nagpur Rain : नागपुरातील महापुराची नेमकी कारणं काय?, कसं झालं नागपूर बेहाल?