Nagpur Crime : सीसीटीव्ही असलेल्या स्मार्ट नागपूरमध्ये 'चेनस्नॅचिंग'च्या घटनांमधील अर्धे आरोपी अज्ञातच
Nagpur Crime News : मागील दोन वर्षांत सुमारे शंभर महिलांचे मंगळसूत्र चोरीस गेले. त्यातील सुमारे अर्ध्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, अशी माहिती आहे.
Nagpur Smart City : शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावून शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात येणार असल्याचे नागपूरकरांना सांगण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षात शहरात शंभरावर 'चेनस्नॅचिंग'च्या घटना घडल्या असून त्यापैकी फक्त अर्धाच मुद्देमाल परत मिळाला आहे. इतर आरोपी अद्याप अज्ञातच असल्याची माहिती मिळाली आहे. प्रमुख चौकात सीसीटीव्ही असल्याने मागील काही काळापासून शहरात चेनस्नॅचिंगचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र तरीदेखील काही प्रमाणात घटना घडतच असतात. मागील दोन वर्षांत सुमारे शंभर महिलांचे मंगळसूत्र चोरीस गेले. त्यातील सुमारे अर्ध्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना (Nagpur Police) यश मिळाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या महिला ठरतात 'सॉफ्ट टार्गेट'
रस्त्यावर भरधाव दुचाकीने येत चेनस्नॅचिंग करत मंगळसूत्र चोरट्यांचा भर असतो. विशेषत: मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉक करणाऱ्या महिलांना टार्गेट करण्यात येते. याशिवाय बाजारपेठांमध्ये मंगळसूत्र उडवणाऱ्या टोळ्या सक्रिय असतात. यात काही महिलांचादेखील समावेश असतो. सणासुदीच्या काळात बाजारपेठांमधील गर्दीचा फायदा घेत मंगळसूत्र उडवले जाते. 2021 व 2022 या वर्षात सुमारे शंभर प्रकरणे समोर आली. यातील सुमारे अर्ध्या गुन्ह्यांची उकल झाली. जर पोलिसांच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर विविध चोऱ्यांमध्ये कोट्यवधींचे दागिने चोरीस गेले, त्यात मंगळसूत्रांचा जास्त समावेश होता. यातील 191 प्रकरणांत जवळपास चार कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. मात्र गल्ली आणि सीसीटिव्ही नसलेल्या ठिकाणी घडलेल्या घटनेतील आरोपी अद्याप अज्ञातच असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे शहरात सीसीटीव्हीच्या जाळ्यांचा विस्तार करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.
हळदीकुंकवाचा कार्यक्रमही चोरट्यांच्या निशाण्यावर
नुकतीच संक्रांत आटोपली असून महिलावर्गात हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महिलांमध्ये दागिन्यांचे मोठे आकर्षण असते. सुबक व आखीव रेखीव दागिने घालण्यासाठी महिलांमध्ये चढाओढ सुरु असते. दरम्यान, गर्दीचा फायदा घेत महिला चोरांच्या टोळ्या सक्रिय असतात. बस प्रवासात दागिने घातलेल्या वृद्ध महिलांना लक्ष्य करून दागिने लंपास केले जातात, तोंडाला स्कार्फ बांधून महिला चोर गुपचूप पिशवी, पर्समध्ये हात घालून अलगद दागिने लंपास करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दागिने घालून बाहेर पडताना गर्दीत सावधगिरी गरजेची आहे.
अशी घ्या काळजी...
- सार्वजनिक वाहनातून किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना शेजारील व्यक्तीच्या हालचालींकडे लक्ष ठेवा.
- महिलांनी महागडे दागिने घालून घराबाहेर एकटे पडणे टाळावे.
- मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉकला जात असताना दागिने घालणे टाळावे.
- महागडे सोने, हिरे आदी दागिने घरी न ठेवता बँक लॉकर्समध्ये सुरक्षित ठेवावे.
- गर्दीच्या ठिकाणी महागडे दागिने घालून जाण्याचे टाळावे.
ही बातमी देखील वाचा...