रामटेक तालुक्यात 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, मित्रानेच केला घात
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात खिंडसी या पर्यटन क्षेत्राच्या शेजारी टेकडीवर एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.
नागपूर : जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात खिंडसी या पर्यटन क्षेत्राच्या शेजारी टेकडीवर एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी 29 डिसेंबरला अतुल हटवार या तरुणासोबत खिंडसी परिसरात गेली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी अतुल हटवार याने फोन करून त्याचे इतर चार मित्र धीरज, होमदास, सौरभ आणि हर्षल यांना बोलावून घेतले. पाचही मित्रांनी पीडित तरुणीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने रात्री उशिरा घरी पोहोचल्यावर आई वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर काल रात्री (2 जानेवारी 2021) पीडित मुलीच्या पालकांनी रामटेक पोलीस स्टेशनला तक्रार दिली. आज पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात अपहरण, सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यासह अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हे नोंदवले गेले आहे. महिला पोलीस अधिकारी घटनेचा तपास करत आहेत.
नागपूरमध्ये महिला असुरक्षित? राजकिरण राजहंस नावाच्या गावगुंडाने पोलिसांच्या उपस्थितीत एका शिक्षिकेला धमकावले. नवीन वर्षाच्या संध्याकाळी नागपूरच्या शांतीनगर परिसरात राहणारी एक शिक्षका आपल्या कुटुंबियांसह बालोद्यान फिरायला आली होती. संध्याकाळी सर्व कुटुंबीय घरी परत जात असताना त्यांच्या दुचाकीने काही गुंडाच्या दुचाकीला कट लागला. गुंडांनी लगेच आपल्या बाईकने शिक्षिका आणि तिचा भाऊ बसलेल्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. राजभवनाच्या मागील गेटजवळ त्यांना अडवत शिवीगाळ करणे सुरू केले. प्रचंड नशेत असलेल्या या गुंडाने थेट शिक्षिकेच्या अंगावर हात घालत तिला रस्त्यावर केस पकडून ओढले.
तर गेल्याच महिन्यात एकतर्फी प्रेमातून नागपुरात एका माथेफिरूने तरुणीच्या घरात घुसून तिच्या लहान भावाची आणि वृद्ध आजीची हत्या केली होती. तर नांगरवान परिसरात एका परिचारिकेवर माथेफिरूने चाकू हल्ला करत तिला गंभीर जखमी केले होते. त्यामुळे नागपुरातील रस्त्यांवर महिलांच्या बाबतीत गुन्हे राजरोसपणे का घडत आहेत. गावगुंडांना पोलिसांची भीती का उरली नाही असे सवाल या घटनेने निर्माण झाले आहेत.
संबंधित बातमी :
पेणमधील चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार : गृह राज्यमंत्री