नागपूरमध्ये लाच घेत ड्रग पेडलर मदत केल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
नागपूरमध्ये पाच पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ड्रग पेडलरला मदत केल्याप्रकरणी आणि लाच स्वीकारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर : नागपूरमध्ये पाच पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नंदनवन पोलीस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांनी 14 ऑक्टोबर रोजी जमाल नावाच्या एका ड्रग पेडलरला एमडी नावाचे प्रतिबंधित ड्रग्ससह पकडले होते. मात्र या पाच पोलिसांनी अडीच लाख रुपयात प्रकरण दाबण्यासाठी आर्थिक सौदेबाजी करत कारवाईत कोणत्याच अमली पदार्थाची जप्ती केली नव्हती. शिवाय जमाल नावाचा तो ड्रग पेडलर संशयास्पदरित्या कारवाईच्या ठिकाणातून पळून गेला होता.
त्यानंतर ड्रग पेडलरच्या माणसांनी लाचेच्या स्वरुपात दिलेल्या अडीच लाख रुपयांच्या मोबदल्यात पोलिसांकडून हस्तगत केलेल्या अमली पदार्थांची मागणी सुरु केली होती. मात्र या पाच पोलिसांनी त्याला अमली पदार्थ परत करण्यास टाळाटाळ केली. अखेर एका निनावी फोनद्वारे प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली.
वरिष्ठांनी डीसीपी झोन-4 मार्फत प्रकरणाची चौकशी करुन घेतली. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत खोलीत आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पेटीत अमली पदार्थांची पिशवी सापडली आणि लाच स्वरुपात स्वीकारलेले अडीच लाख रुपये आढळून आले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी पोलिसांना तातडीने अटक करण्यात आली असून फरार ड्रग पेडलरचा शोध सुरु आहे.
अटक पोलीस कर्मचाऱ्यांची नावं - सचिन प्रेड्डीवार - राजेंद्र शिरभाते - दिलीप अवगण - रोशन निंबार्ते - अभय मारोडे