(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Cultural : दिपाली घोंगेच्या 'युद्धस्य कथा रम्या'नी रसिक भारावले, सर्वांगसुंदर एकपात्री प्रयोगाची मिळाली अनुभूती
कृष्णाच्या परस्पेक्टिव्हने महाभारताचे युद्ध प्रस्तुत करताना दिपाली घोंगे यांच्या अभिनयाचा कस लागला. या एकपात्री प्रयोगाचा आगळावेगळा अनुभव रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला.
नागपूर: अभिनेत्री, दिग्दर्शिका दिपाली घोंगे यांचा सहज सुंदर अभिनय, दमदार आवाज, प्रभावी संवादफेक, कृष्णाचा आकर्षक पेहेराव, उत्कृष्ट प्रकाशव्यवस्था, समर्पक मंचसज्जा आणि खिळवून ठेवणारी ध्वनीव्यवस्था या सर्वांमुळे 'युद्धस्य कथा रम्या'चा प्रयोग सर्वांगसुंदर ठरला. महाभारतातील विविध प्रसंगांचे दमदार सादरीकरण करून दिपाली घोंगे यांनी रसिकांना खिळवून ठेवले.
ETE श्री (Education throunh entertainment)संस्थेतर्फे मंगळवारी सायांटिफिक सभागृहात 'युद्धस्य कथा रम्या' चा एकपात्री प्रयोग सादर झाला. उद्घाटन कार्यक्रमाला संस्कार भारतीच्या महानगर अध्यक्ष कांचन गडकरी, माजी महापौर प्रा. अनिल सोले, प्रयोगाचे दिग्दर्शक व ETE श्री संस्थेचे संचालक डॉ. पराग घोंगे व मकरंद घोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कांचन गडकरी यांनी दिपाली घोंगे यांचे कौतूक करताना त्यांच्या प्रयोगाला शुभेच्छा दिल्या तर प्रा. अनिल सोले यांनी गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आवाहन केले.
RTO Nagpur : दुचाकी वाहनाकरीता नवीन मालिका सुरु, ऑनलाइन प्रक्रियेमुळे डीलरशिपमध्येच वाहनांची नोंदणी
कृष्णाच्या परस्पेक्टिव्हने महाभारताचे युद्ध प्रस्तुत
गांधारीच्या शापाला सामोरे जाताना महाभारताचे युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्ण धृतराष्ट्राच्या राजसभेत पांडवांचा दूत होऊन जातो. परंतु कृष्ण शिष्टाई असफल ठरते आणि महाभारताचे भीषण युद्ध घडते. धर्म-अधर्माच्या या युद्धात मन विदीर्ण करणारा नरसंहार होतो. श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध निकराने लढायला लावतो पण तो स्वत: संलिप्तही आणि अलिप्त राहतो. कृष्णाच्या परस्पेक्टिव्हने महाभारताचे युद्ध प्रस्तुत करताना दिपाली घोंगे यांच्या अभिनयाचा कस लागला. या एकपात्री प्रयोगाचा आगळावेगळा अनुभव रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. नेपथ्याची बाजू सतीश काळबांडे यांनी तर प्रकाशयोजना किशोर बत्तासे यांनी व पार्श्वसंगीताची बाजू अनिल इंदाणे यांनी अतिशय समर्थपणे हाताळली. सुरुवातीला संस्कार कथक केंद्राच्या कलाकारांनी प्रियंका अभ्यंकर यांच्या नेतृत्वात नृत्यवंदना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पराग घोंगे यांनी तर तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल देव यांनी केले.