Baba Tajuddin Urs : जगभरातून 15 लाख भाविक होणार सहभागी, बाबा ताजुद्दीन शताब्दी वर्ष उर्स 21 ऑगस्टपासून
ताजाबादच्या दरबारी भाविक मोठ्या संख्येने जमतात. वार्षिक उर्सच्या दिवशी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे सर्व विश्वस्त हेलिकॉप्टरवरुन दर्ग्यावर पुष्पवृष्टी करतील.
नागपूरः सर्वधर्म समभावचे प्रतिक सूफी संत बाबा ताजुद्दीन (र.अ) यांचा 100 वा वार्षिक उर्स 21 ऑगस्ट ते 3 नोव्हेंबर दरम्यान ताजाबाद शरीफ येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या शताब्दीवर्षात जगभरातून 15 लाख भाविक येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.सुरेंद्र जिचकार, सचिव ताज अहमद राजा, विश्वस्त फारुख बावला, बुर्जिन रांडेलिया, मुस्तफा टोपीवाला, इम्रान खान, गजेंद्रपाल सिंह लोहिया आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळात निर्बंध असल्याने दोन वर्षानंतर हा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तसेच शताब्दी वर्ष साजरा करण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
300 सीसीटिव्हीची नजर
यंदा अमेरिका आणि इजराईल येथील भाविक चादर पाठवणार आहेत. येणाऱ्या भाविकांच्या राहण्याच्या सोयीसाठी अडीच लाख चौ. फुटाच्या भव्य डोमची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच 750 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. तर 300 सीसीटिव्हीची नजर यावर राहील. तसेच भाविकांना रेल्वे स्थानक, बस स्थानकावरुन येण्या-जाण्यासाठी मनपातर्फे आपली बसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
कार्यक्रम खालील प्रमाणे
21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता दर्ग्याचे सज्जादानशीन सैयद यूसुफ इकबाल ताजी आणि मदरसा जामिया अरेबिया इस्लामियाचे संचालक मुफ्ती अब्दुल कदीर खान यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमंत पंचम राजे रघुजी भोसले यांच्या हस्ते पारंपारीक पद्धतीने परचम कुशाई विधीने उर्सची सुरुवात होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुस्लिम धर्मगुरू मौलाना सय्यद मोहम्मद हाश्मी मियाँ (यूपी) उपस्थित राहणार आहेत.
26 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता छोटा कुल शरीफ यांचा फातेहा आणि रात्री 10 वाजता अखिल भारतीय नाटय़ मुशायरा होणार आहे. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बडा कुल शरीफचे आयोजन करण्यात येणार आहे. 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता दर्गा परिसरातच अखिल भारतीय नाट ख्वानीचा कार्यक्रम होणार आहे. 1 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता अखिल भारतीय सुफियाना कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता ताजाबाद दर्गा संकुलात आंतरराष्ट्रीय सुफी कॉन्फरन्समध्ये पत्रकारांशी संवाद साधणार आहे. यामध्ये जगातील अनेक देशांतून येणारे विविध धर्माचे धर्मगुरू संवाद साधतील. त्यानंतर दररोज रात्री 10 वाजता आंतरराष्ट्रीय सुफी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ताजाबादमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत वार्षिक उर्सची भव्य जत्रा सुरू राहील.
दोन वर्षांनी निघणार शाही संदल..
25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयातून दरबारी शाही संदल काढण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणांहून सायंकाळी सहा वाजता संदल पुन्हा ताजाबाद येथे येईल. दोन वर्षांनंतर दरबारी शाही संचलनाचे आयोजन करण्यात येत आहे. ताजाबादच्या दरबारी भाविक मोठ्या संख्येने जमतात. वार्षिक उर्सच्या दिवशी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे सर्व विश्वस्त हेलिकॉप्टरवरुन दर्ग्यावर पुष्पवृष्टी करतील.