Nagpur Crime : अजित पारसे अद्यापही व्यसनमुक्ती केंद्रातच; अटक टाळण्यासाठी नागपूर पोलिसांवर कोणाचा दबाव?
अजितने सोशल मीडियाचा वापर करुन अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. विविध आमिषे दाखवून तसेच हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याने सात डॉक्टरांसह सुमारे 15 जणांना 50 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा गंडा घातल्याचे कळते.
Nagpur News : स्वयंघोषित माध्यम विश्लेषक अजित पारसे याने शहरातील उच्चभ्रू वर्गातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. या ठगाने डॉ. राजेश मुरकुटे यांची तब्बल साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतरही तो अद्यापही मोकाट असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याला अटक झाली नसल्याने अनेक पीडित अद्यापही पोलिसांसमोर आलेले नाहीत, त्याला अटक न करण्यासाठी कोणत्या नेत्याकडून पोलिसांना सूचना तर नाही? अशी चर्चा शहरात सुरु आहे.
या ठगाला अटक झाल्यास अनेक पीडित समोर येतील अशी चर्चा आहे. मात्र पारसे स्वतः शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ नसल्याने त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अजित पारसे याने राजकीय ओळख असल्याचे दाखवून अनेकांना मोठमोठी प्रलोभने दिली. एका डॉक्टरने धाडस केल्यानंतर त्याचे बिंग फुटले. मात्र, अद्यापही अनेकांनी केवळ तक्रारी केल्या नसल्याने इतर प्रकरणे समोर आलेली नाहीत.
या उलट अजितने वारंवार आत्महत्येचा प्रयत्न केले होते. सध्या त्याने व्यसनमुक्ती केंद्रात तळ ठोकला आहे. पारसेला अटक करुन न्यायालयीन कोठडीअंतर्गत त्याची कारागृहात रवानगी करा. तो खरंच आजारी असेल तर नियमानुसार, त्याचा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार करा, अशी मागणीही आता जोर धरत आहे. अजितने सोशल मीडियाचा वापर करुन अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. विविध आमिषे दाखवून तसेच हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याने सात डॉक्टरांसह सुमारे 15 जणांना 50 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा गंडा घातल्याचे कळते.
गुन्हा दाखल होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्याला अटक झाली नाही. त्यामुळे डॉ. मुरकुटे वगळता त्याच्याविरुद्ध कोणीही तक्रार केली नाही. प्रकृती अत्यवस्थ असल्याने पारसेला अटक करण्यात आलेली नाही. कोणताही दबाव नसून त्याच्याविरुद्ध दाखल प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येत आहे, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
- अजित पारसे विरुद्धची पहिली तक्रार महाल येथील डॉ. मुरकुटे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर सर्व प्रकरण समोर आले होते.
- गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पारसेच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. सोबतच त्याच्या महागड्या दुचाकीसह नऊ गाड्या पोलिसांनी जप्त केल्या.
- रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस घरी धडकल्यापासून पारसेने आपल्या हातावर चाकूने कापण्याचे प्रयत्न केले असल्याची माहिती आहे.
- पारसेच्या सहा बँक खात्याचे पासबुक पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याचे लॉकरही सील करण्यात आले असून लवकरच लॉकरची तपासणी करण्यात येणार आहे.
- पारसेविरुद्ध तक्रार करण्यासाठी 20 पेक्षा अधिक डॉक्टर आणि व्यावसायिक पोलिसांना भेटले असून, पोलीस त्यांच्या लेखी तक्रारींची वाट पाहत आहेत.
महत्त्वाची बातमी