Afghanistan News : नागपुरातून अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आलेला नूर मोहम्मद तालिबानी तुकडीत सहभागी?
Afghanistan News : वायरल झालेल्या फोटोवरून नवे प्रश्न निर्माण झाले असून नूर मोहम्मदची सखोल चौकशी न करताच नागपूर पोलिसांनी त्याला परत पाठवले का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
Afghanistan News : दोन महिन्यांपूर्वी भारतात / नागपुरात बेकायदेशीर राहत असल्याच्या आरोपात नूर मोहम्मद नामक अफगाणिस्तानी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्राथमिक चौकशी करून नूर मोहम्मदला नागपूर पोलिसांनी हद्दपार करत अफगाणिस्तानला परत पाठवले होते. तोच नूर मोहम्मद आता तालिबानच्या एका तुकडीत हातात बंदूक घेऊन सहभागी झाल्याचे फोटो सध्या वायरल होत आहेत.
वायरल होत असलेला तो फोटो नूर मोहम्मदचाच आहे की, नाही? हे ठामपणे सांगता येणं शक्य नसल्याचं नागपूरच्या पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांनी नूर मोहम्मदला ताब्यात घेतलं होतं, तेव्हा त्याच्या मोबाईल फोनमध्ये काही तालिबानी व्हिडीओ आढळले होते, तसेच तो काही तालिबानी नेत्यांचे ट्विटर फॉलो करत असल्याचंही पोलिसांना आढळलं होतं. तेव्हा नूरच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीचे व्रण दिसून आले होते. मात्र, नंतर नागपूर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत नूर मोहम्मदनं नागपुरात कुठलेही बेकायदेशीर कृत्य केलं नसल्याचं लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेत त्याला परत पाठविलं होतं.
या संदर्भात आज पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना विचारले असता, ते म्हणाले की, नूर मोहम्मदला अफगाणिस्तानला परत पाठवल्यानंतर तो काय करतोय? हे जाऊन घेण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही.
धक्कादायक म्हणजे, नूर मोहम्मद सुमारे 10 वर्षांपूर्वी मेडिकल टुरिस्ट वीजावर भारतात आला होता. त्यानंतर तो मुदत संपल्यावर मायदेशी परत गेला नव्हता. आणि बेकायदेशीररित्या सुमारे दहा वर्ष नागपुरात वास्तव्यास होता, या दरम्यान त्यानं कुठं रेकी केली का? नागपुरात कोणत्या उद्दिष्टाने थांबला होता? तो इथं कोणावर नजर ठेवून होता का? असे अनेक प्रश्न सध्या ही अनुत्तरित आहेत.
दरम्यान, अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान्यांची सत्ता आली आहे. 20 वर्षांपूर्वीची भीतीची परिस्थिती पुन्हा तिथं दिसू लागली आहे. तालिबान्यांच्या दहशतीमुळे अनेकांवर देश सोडून जाण्याची वेळ आली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना आपल्या देशात आणण्याचे मिशन सुरु आहे. सुत्रांचं म्हणणं आहे की, 15 ऑगस्टपूर्वी ऑपरेशन एअरलिफ्टची तयारी सुरु होती. 15 ऑगस्ट रोजी काबूलमधील भारतीय दूतावासापासून सुमारे 70 मीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकू आला, त्यानंतर भारतीयांच्या सुरक्षेविषयी चिंता वाढली होती.