शिवसेना नेतृत्वाला दिशाहीन म्हणत नागपुरातील 80 शिवसैनिकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'
कधी भाजपला टोकाचे विरोध तर निवडणुकांच्या वेळी भाजपसोबत घरोबा अशा दिशाहीन धोरणाला कंटाळूनच आम्ही पक्षाला सोडचिट्ठी दिल्याचंही या शिवसैनिकांनी सांगितलं.

नागपूर : एका बाजूला भाजपसोबत युतीचा शिवसेनेचा कोणताही निर्णय होत नाही, तर दुसऱ्या बाजूला नागपुरात जवळपास 80 शिवसैनिकांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. शिवसेना नेतृत्वावर दिशाहीन धोरणाचा आरोप करत शिवसैनिकांनी पक्षाला राम राम ठोकला आहे.
सर्व नाराज शिवसैनिकांनी काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या घरी जाऊन आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे हे सर्व शिवसैनिक दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातले आहेत. हा मतदारसंघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे.
गेली साडेचार वर्ष शिवसेना नेमकी भाजपच्या विरोधात आहे की भाजपच्या सोबत आहे, हेच आम्हाला समजत नाही. त्यामुळे आम्ही अखेर शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याचं नाराज शिवसैनिकांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे नेते मुंबईत बसून पक्षाला दिशा देण्याचा प्रयत्न करतात. छोट्या छोट्या आंदोलनासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे आमची नेमकी दिशा कोणती हेच आम्हाला समजत नव्हते, असा आरोपही या नाराज शिवसैनिकांनी केला.
कधी भाजपला टोकाचे विरोध तर निवडणुकांच्या वेळी भाजपसोबत घरोबा अशा दिशाहीन धोरणाला कंटाळूनच आम्ही पक्षाला सोडचिट्ठी दिल्याचंही या शिवसैनिकांनी सांगितलं.























