Nagpur Voilance: विश्व हिंदू परिषद अन् बजरंग दलाच्या 8 कार्यकर्त्यांना जामीन; पोलिसांसमोर केलं होतं आत्मसमर्पण
Nagpur Voilance: विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत कायद्याशी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली होती.

Nagpur Voilance: नागपूरमधील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मिळाला आहे. या आठही जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं.
17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही संघटनांच्या नऊ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यापैकी आठ जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत कायद्याशी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली होती.
19 मार्च रोजी पोलिसांसमोर केलं होतं आत्मसमर्पण-
19 मार्च रोजी दुपारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. वैद्यकीय चाचणी करून त्यांना न्यायालयासमोर उपस्थित केलं. न्यायालयाने सर्व आठही जणांना जामीन दिला आहे.
सोशल मीडिया अकाउंट्सवर महाराष्ट्र सायबर सेलकडून कारवाई-
नागपूर हिंसाचार प्रकरणात प्रक्षोभक मजकूर पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर महाराष्ट्र सायबर सेलकडून कारवाई केली. नागपूर दंगलनंतर सोशल मिडियावर महाराष्ट्र सायबर पोलिसांचे पथक विशेष लक्ष ठेवून आहेत. नागपूर दंगलीनंतर काही आक्षेपार्ह दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सायबर पोलिसांनी हटवल्या आहेत. या पोस्ट प्रामुख्याने जाणूनबुजून एका विशिष्ट धार्मिक गटाच्या भावना दुखावण्यासाठी, जातीय अशांतता भडकविण्यासाठी आणि राज्यातील सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी बिघडवण्यास मदत होईल अशा होत्या.
आक्षपार्ह पोस्ट टाकणे किंवा शेअर करणे टाळावे-
सायबर पोलिसांना आतापर्यंत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवर १४० आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्या असून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा, २००० च्या कलम ७९(३)(ब) अंतर्गत अशा कंटेंटला तात्काळ काढून टाकण्यासाठी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस), २०२३ च्या कलम ९४ अंतर्गत ही अकाउंट्स चालवणाऱ्या व्यक्तींची खरी ओळख उघड करण्यासाठी नोटिस जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रक्षोभक कंटेंटचा प्रसार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असून नागरिकांनी सोशल मिडियावर अशा आक्षपार्ह पोस्ट टाकणे किंवा शेअर करणे टाळावे असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
नागपूर राड्याचा सर्वात मोठा ठपका असलेला फहीम खान कोण?
नागपूर तणावाबाबत एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. एफआयआरनुसार फहीम शमीम खानने जमाव जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. फहीम खान मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. महत्वाचं म्हणजे हाच फहीम खान पोलीस स्टेशनला निवेदन देण्यास गेला होता. नागपूरमधील तणावाबाबत पोलिसांनी 51 लोकांवर एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये फहीम शमीम खान याचं नाव आघाडीवर आहे. फहीम खाननेच सगळ्यातआधी सकाळी 11 वाजता 30 ते 40 जणांचा जमा केले आणि पोलिसांना निवेदन देण्यास गेला. यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात आरोप फहीम खानने पोलिसांकडे केला. यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतरदेखील फहीम खानने पुन्हा जमाव एकत्र केला आणि तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली.
फहीम खानचा नागपूर हिंसाचाराशी काहीही संबंध नाही- VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

