Viral Video: वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी लाज सोडली, नळावर भांडतात तसं एकमेकांनी कोपराने ढोसलं, नागपूरमध्ये सरकारी कार्यक्रमात सरकारची अब्रू वेशीवर टांगली
Nagpur News : नागपुरात सरकारी कार्यक्रमात एक विचित्र प्रकार घडला आहे. यात चक्क महिला अधिकाऱ्यांची विचित्र धुसफूस पाहायला मिळालीय.

Nagpur News : नागपुरात सरकारी कार्यक्रमात एक विचित्र प्रकार घडला आहे. यात चक्क महिला अधिकाऱ्यांची विचित्र धुसफूस पाहायला मिळालीय. विशेष म्हणजे, नागपुरात काल (24 ऑक्टोबर) झालेल्या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरच या दोन महिला अधिकाऱ्यांची धुसफूस घडलीय. सध्या त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनी सरकारी कार्यक्रमात सरकारची अब्रू वेशीवर टांगली
दरम्यान, या व्हिडिओत दिसत आहे की पोस्ट खात्यातील एक उच्चपदस्थ महिला अधिकारी दुसऱ्या उच्च पदस्थ महिला अधिकारीला ढोपराने धक्के देत आहे. दोघींमध्ये ही वाद पोस्ट मास्टर जनरल पदावरुन झाल्याची शक्यता आहे. नागपूर विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांची 8 सप्टेंबरला कर्नाटक येथील घारवाडला बदली झाली. त्यांच्या जागी नव्या नियुक्तीपर्यंत नागपूरचा प्रभार नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी यांना दिला गेला होता. दरम्याच्या काळात बदलीच्या आदेशावरून मधाळे यांनी न्यायालयात धाव घेत आणि बदलीवर स्थगिती मिळवली. त्यामुळे मधाळे आणि जोशी यांच्यात सुप्त वाद सुरु होते, तोच वाद काल रोजगार मेळाव्यात दिसून आला.
हाताला धक्का दिला, डाव्या हाताला चिमटाही काढला, धुसफूस कॅमेऱ्यात कैद
दरम्यान, कालच्या रोजगार मेळाव्यात पोस्ट मास्टर जनरल निमंत्रित होत्या, त्यामुळे कार्यभार सांभाळणाऱ्या सुचीता जोशी मंचावर होत्या. तर शोभा मधाळे या सुद्धा कार्यक्रमात आल्या, एकाच सोफ्यावर शेजारी-शेजारी दोघीही बसल्या आणि दोघींमध्ये त्यानंतर धुसफूस सुरु झाली. मधाळे यांनी जोशी यांच्या हाताला धक्का दिला, डाव्या हाताला चिमटाही काढला. हा सारा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. मात्र दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये झालेला हा प्रकार आणि दोघींची वर्तवणूक लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























