(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दहशतवादी जान मोहम्मदच्या संपर्कातील जाकीर शेख, रिझवान मोमीनला अटक, दोघांचीही डीएनए तपासणी होणार
दहशतवादी जान मोहम्मदच्या अटकेनंतर जाकीर शेख देश सोडून पळण्याच्या तयारीत होता, त्याचा हा कट हाणून पाडत. महाराष्ट्र एटीएसनं त्याला अटक केली आहे.
मुंबई : महाराष्ट्र दहशतवादी पथकानं जाकीर शेख आणि रिजवान मोसिनचे डीएनए सॅम्पल घेतले असून त्यांना फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून 6 अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती, ज्या मधील एक अतीरेकी जान मोहम्मद हा मुंबईच्या धारावीमध्ये राहणारा होता. त्यानंतर दहशतवादी पथक ॲक्शन मोडमध्ये आलं आणि त्यांनी जाकीर हुसेनला अटक केली. जाकीर हुसेच्या चौकशीमध्ये रिजवान मोमीनच नाव समोर आलं त्यानंतर महाराष्ट्र दहशतवादी पथकाने त्यालाही अटक केली.
कोण आहे जाकीर शेख ?
जाकीर शेख मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातील बेहराम बागमध्ये राहत होता. तो त्याची पत्नी गेले कित्येक वर्षांपासून तिथे राहत होते, जाकीर शेख हा रिक्षा चालवायचा. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून अटक करण्यापूर्वीसुद्धा जाकीर शेखवर गुन्हे दाखल आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जाकीर शेख हा दाऊद गॅंगसाठी काम करायचा. जाकीर शेख विरोधात मुंबई पोलीस दलातील खंडणीविरोधी पथकामध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. हे तिन्ही गुन्हे खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल करण्यात आले असून 2001, 2007, 2015 मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2001 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात जाकीर शेखला शिक्षा सुद्धा झाली होती.
महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या तपासात समोर आल आहे की, जाकीर शेख हा शेजारच्या देशातील कुठल्या तरी अँथोनी नावाच्या व्यक्तीशी बोलत होता. मात्र अँथोनी हे खरं नाव नसून त्याचं कोडनेम होतं, जसं जाकीर शेखच कोडनेम 'चाचा' असं होतं. अँथोनीच्यावतीने जाकीर शेख हा भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी माणसांची निवड करायचा आणि ज्यांच्याकडे पैसे नसायचे, ज्यांची परिस्थिती हालाखीची असायची अशा माणसांची निवड जाकीर शेख करायचा.
ज्या जान मोहम्मद शेखला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. तो जाकीर शेखच्या संपर्कात होता, जेव्हा जान मोहम्मद शेखला दिल्लीला जाण्याचे निर्देश आले, त्या वेळेला त्याला दीड लाख रुपये हवाल्याच्या माध्यमाने पाठवण्यात आले होते. ज्या मधील 25000 रु त्याने जाकीर शेखला दिले होते.
जान मोहम्मदला अटक करण्यात येणार असल्याची माहिती जेव्हा जाकीर शेखला मिळाली, तेव्हा त्याने मुंब्रा येथे राहणाऱ्या रिजवान मोमीनशी संपर्क केला आणि त्याला सर्व काही सांगितलं. रिजवान मोमीनने जाकीर शेखला मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट करण्यास सांगितले मात्र जाकीर शेखला तो डेटा डिलीट करता येत नव्हता म्हणून तो मुंब्रा येथे रिजवान मोमीनच्या घरी गेला. रिजवान मोमीनने जाकीर शेखचा मोबाईल तोडून गटारात फेकून दिला. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानं या दोघांना अटक केल्यानंतर तो मोबाईल नाल्या मधून शोधून काढला.
कोण आहे रिजवान मोमीन?
रिजवान मोमीन आणि त्याची पत्नी दोघेही शिक्षक आहेत. एका खाजगी क्लासमध्ये दोघेही शिकवतात. महिन्याभरा पूर्वीच दोघे मुंब्रा येथील एवोन नुरी रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये राहायला आले होते. म्हणून कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांना यांच्याबद्दल काहीही माहिती नाही.
रिजवान मोमीन आणि त्याची पत्नी कौसा येथील एका क्लासमध्ये शिकवायचे, मुंब्रा येथे स्थलांतर होण्याआधी ते वांद्रे येथे राहत होते. वांद्रे येथून कौसाला जाण्यासाठी खूप वेळ लागत होता. ज्यामुळे दोघे नवरा-बायको मुंब्रा येथे स्थलांतरित झाले.
रिजवान मोमीन जेव्हा मुंब्रा येथे राहायला आले तेव्हा जाकीर शेख आणि त्याची पत्नी हे दोघे जाऊन त्याच्या घरी दोन दिवसासाठी राहिले होते, त्यावेळी रिजवानच्या मोबाईल वरून झाकीर शेख हा अँथनी सोबत बोला असल्याचे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जान मोहम्मद शेखला अटक झाल्यानंतर जाकिर शेख देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता. ज्यासाठी त्याने त्याचा पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि सर्व कागदपत्रे सोबत घेतली होती.