कल्याणमध्ये पोलिसाच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर शहरात काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी व्यापाऱ्याला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती. यानंतर आता पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुण व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलिसांविरोधात मोठा रोष पाहायला मिळत आहे.
कल्याण : पोलिसाच्या जाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या आत्महत्येप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश खेडकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याने महिनाभरापूर्वीच चोपडा कोर्ट परिसरात जंकफूडचं दुकान सुरु केलं होतं. मात्र मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील पोलीस त्याला त्रास देत असल्यानं तो मानसिक तणावाखाली होता.
कॉन्स्टेबल पवन केदार हा वारंवार आपल्याकडे पैसे मागतो आणि मानसिक त्रास देतो, असं सतीशने त्याचा भाऊ आणि मित्रांना सांगितलं होतं. त्यातच गुरुवारी पुन्हा एकदा पवन केदारने त्याला त्रास दिल्याने सतीशने घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रात्रीपासून मध्यवर्ती पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली.
दोषी पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत सतिशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत मोठा जमाव आज दुपारपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर बसून होता. अखेर पोलीस कॉन्स्टेबल पवन केदार याच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जमावाने ठिय्या आंदोलन मागे घेतलं.
उल्हासनगर शहरात काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी व्यापाऱ्याला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती. यानंतर आता पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुण व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलिसांविरोधात मोठा रोष पाहायला मिळत आहे.