(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे बाहेर येणार? महाविकास आघाडीकडून 'पोलखोल' प्लॅन!
महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर सातत्याने होणाऱ्या आरोपांची आता महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतली आहे. महाविकास आघाडी सरकार देखील भाजपला जशास तसं उत्तर देणार असल्याची माहिती आहे
मुंबई : भाजपकडून खासकरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ, अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि अन्य काही नेत्यांवर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. यावर महाविकास आघाडीकडून आरोपांचं खंडण केलं जात आहे, आरोप फेटाळले जात आहेत. तसेच काही मंत्र्यांनी सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावा देखील करण्याबाबत सांगितलं आहे.
Anil Parab यांचा Kirit Somaiya यांच्याविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा, परब म्हणाले...
महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर सातत्याने होणाऱ्या आरोपांची आता महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतली आहे. महाविकास आघाडी सरकार देखील भाजपला जशास तसं उत्तर देणार असल्याची माहिती आहे. फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळ्यांची प्रकरणं महाविकास आघाडी सरकार बाहेर काढणार असल्याची माहिती आहे.
फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळ्यांची पोलखोल करण्यासाठी विशेष समिती तयार केल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. समितीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील एका सदस्यांचा समावेश असणार आहे. यामुळं लवकरच भाजपच्या माजी मंत्र्यांची देखील घोटाळ्याची प्रकरणे बाहेर येणार असल्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्यांविरोधात मानहानीचा दावा
महाविकास आघाडीतील मंत्री अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर आता हे दोघे सोमय्यांच्या विरोधात मानहानी करणार आहेत. परब यांनी यासंदर्भात म्हटलं आहे की, गेले काही महिने माझ्यावर किरिट सोमय्या कुठलेही पुरावे नसताना आरोप करत आहेत. याबद्दल मी 100 कोटींचा दावा दाखल केलाय. यात माफी मागण्याचीही मागणी केलीय. पुरावेही जोडले आहेत. यात मला न्याय मिळेल, असं मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. मी चुकीचे काही केलेले नाही. मी न्यायमुर्तीचे काम हातात घेतलेले नाही. जसं किरिट सोमय्या हातात घेतात, असं परब यांनी म्हटलं होतं.