महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का? : गृहमंत्री
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाआड मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम झालं, असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना प्रचाराला बिहाराचे भाजप प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस जाणार का असा सवालही देशमुख यांनी विचारला.
मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात एम्समधील डॉक्टरांच्या पॅनलचा अहवाल समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा जनता माफ करणार नाही, असं अनिल देशमुख म्हणाले. यासोबत महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना प्रचाराला बिहाराचे भाजप प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस जाणार का असा सवालही देशमुख यांनी विचारला.
महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांनी माफी मागावी : अनिल देशमुख ज्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांचं नेतृत्त्व केलं, त्या देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांचा तपाय योग्य दिशेने सुरु नसल्याचं म्हटलं होतं. ज्या पद्धतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम काही पक्षांमार्फत झालं, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही.
बिहारमधील माजी पोलीस संचालक आता निवडणूक लढत आहेत. तर महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस बिहारचे भाजप प्रभारी आहेत. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस तिथे जाणार का? असा माझा त्यांना प्रश्न आहे.
तिन्हीच पक्षांनीच पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला : राम कदम मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं काम या तिन्ही पक्षाच्या सरकारने केलं आहे. चोराच्या उलट्या बोंबा. स्वत: पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करायचा. मुंबई पोलिसांची प्रतिमा ही शौर्याची आहे. त्यांना मोकळेपणाने काम करु द्यावं, त्यांच्या कामात हस्तक्षेप करु नये, अशीच आमची भूमिका होती. या तिन्हीच पक्षांनीच पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, प्रत्यारोप भाजपचे नेते राम कदम यांनी केला.
अतुल भातखळकर यांचा गृहमंत्र्यांवर पलटवार अनिल देशमुख हे आजपर्यंतचे सर्वात बेजबाबदार आणि राजकीय गृहमंत्री असल्याची केली टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच फडणवीस आणि भाजप कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही आव्हान त्यांनी दिलं. यापूर्वी फोन टॅपिंगची चौकशी करु असं जाहीर करणाऱ्या गृहमंत्र्यांनी त्या चौकशीचं काय झालं ते आधी स्पष्ट करावं. तसेच कोरोना, वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि गुन्ह्यांमध्ये वाढ यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या