(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लिपस्टिकमुळे उलगडलं हत्येचं गुढ, आरोपी पत्नीला प्रियकरासह अटक
चहाच्या कपवर लागलेल्या लिपस्टिकमुळे हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याच धक्कादायक प्रकार भाईंदरमध्ये समोर आला आहे.
मुंबई : पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदरमध्ये समोर आला आहे. गुन्हा केलेले आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटत नाहीत. एक छोटासा पुरावा पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा असतो. अशाच्या एका छोट्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याच्या छडा लावला आणि दोन आरोपींना अटक केली आहे. चहाच्या कपवर लागलेल्या लिपस्टिकमुळे हत्येचा उलगडा झाला आहे.
प्रमोद पाटणकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नी दिप्ती पाटणकर आणि समाधान पाषाणकरला अटक केली आहे. दिप्तीचा प्रमोद यांच्याशी विवाह झाला होता. मात्र 2015 सालापासून दिप्तीचे आपल्या आतेभाऊ समाधान पाषाणकरचे प्रेमसंबध होते. पती प्रमोदला याची कुणकुण लागली होती. प्रेमसंबंध कळल्यामुळे प्रमोद दिप्तीला त्रास देऊ लागला होता. म्हणून प्रमोदला कायमचं संपवण्याचं दिप्तीने ठरवलं. त्याप्रमाणे तिने प्रियकर समाधानच्या साथीने प्रमोदला जीवे मारण्याचा प्लान केला.
त्याप्रमाणे 15 जुलै 2019 ला प्रमोदला मारण्याचं दोघांनी ठऱवल. दिप्तीने आपल्या लहान मुलीला 14 जुलै रोजी, रात्रीच आई-वडिलांकडे नेऊन सोडले. 15 जुलैला सकाळी तिने प्रमोदला चहा बनवून त्यात 20 झोपेच्या गोळ्या घातल्या. चहा प्यायल्यानंतर काहीवेळाने प्रमोद झोपी गेला. त्यानंतर दिप्तीने समाधानला बोलावून घेतले. त्याप्रमाणे समाधान आणि दिप्तीने प्रमोदला गळा आवळून मारुन ठार केलं.
प्रमोदने दुसरी स्त्री बोलावून तिच्यासोबत चहा प्यायला, असं भासवण्यासाठी दिप्तीने चहा बनवला आणि ती तेथून निघून गेली. त्यानंतर समाधानने त्याच्या ओठाला लिपस्टिक लावली आणि ओठ चहाच्या कपाला लावले. तसेच बेडरुममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलं. अनोखळी महिलेने हत्या करुन चोरी केली, असं दाखवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र ज्या कपवर लिपस्टिक लावली होती, त्याच लिपस्टिकचा आधार घेत पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपी दिप्ती पाटणकर आणि समाधान पाषाणकरला अटक केली आहे.