गणपती स्पेशल गाड्यांकडे चाकरमान्यांनी पाठ का फिरवली?
कोकणात गाड्या सोडण्याच्या निर्णयांमध्ये अतिशय विलंब केल्याने चाकरमानी आधीच गावी पोहोचला. त्यामुळे या विशेष गाड्यांचा कोकणवासीयांना काहीच उपयोग नाही, असे प्रवाशांचे मत आहे.
मुंबई : अनेक वाद आणि अडचणींना मागे टाकत कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. मात्र या रेल्वे गाड्यांचा कोकणवासीयांना काहीच फायदा झाला नाही. याबाबतीत जर आधीपासून नियोजन करण्यात आले असते तर कदाचित चाकरमान्यांना याचा फायदा झाला असता. गणपती चार महिन्यांवर आले की मुंबईतल्या चाकरमान्यांची लगबग सुरू होते कोकण रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी. दिवस-रात्र स्टेशनवर रांगा लावून मिळेल ते तिकीट घेऊन चाकरमानी गणपतीला गावी पोहोचतात. यावर्षी मात्र कोविड-19 मुळे सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असताना कोकणात जायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. या प्रश्नाबाबत एबीपी माझा अनेक प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांनी आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आणि 15 ऑगस्टपासून कोकणात गाड्या सोडण्यात आल्या. मात्र काल सुटलेल्या चार गाड्यांमध्ये 6400 ऐवजी फक्त 1048 प्रवासी प्रवास करत होते. 15 ऑगस्टला मुंबईतून कोकणात गेलेल्या ट्रेन्सची केवळ 20 टक्के सीट्स बुकिंग झाल्याचं चित्र समोर आलं आहे. सेकंड आणि थर्ड एसीच्या बोगी रिकाम्या असल्याची माहिती आहे.
रेल्वेचा तोटा किती?
सीएसएमटी ते सावंतवाडी ही संपूर्ण 24 डब्यांची गाडी जर पूर्णपणे रिझर्व्ह झाली असती तर रेल्वेला आठ ते नऊ लाखांचे तिकिटांची उत्पन्न मिळाले असते. मात्र काल ज्या गाड्या गेल्या त्यातून केवळ 50 ते 60 हजार रुपये तिकिटाचे रेल्वेला मिळाले.
एक गाडी चालवण्यास रेल्वेला किती खर्च येतो?
कोणतीही लांब पल्ल्याची गाडी चालवायची असेल तर त्यामध्ये वेगवेगळे खर्च असतात. ऑपरेशनल कॉस्ट सर्वात महत्वाची असते. त्यानंतर ट्रॅक मेंटेनन्स कॉस्ट, कोच मेंटेनन्स कॉस्ट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे खर्च त्यामध्ये असतात. हे सर्व सोडून कर्मचाऱ्यांचे पगार देखील यामध्ये ग्राह्य धरावे लागतात. हा सर्व खर्च मिळून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा प्रचंड जास्त असतो.
कोकणात गाड्या सोडण्याच्या निर्णयांमध्ये अतिशय विलंब केल्याने चाकरमानी आधीच गावी पोहोचला. त्यामुळे या विशेष गाड्यांचा कोकणवासीयांना काहीच उपयोग नाही, असे प्रवाशांचे मत आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण 182 रेल्वेच्या फेऱ्या मुंबई ते कोकण दरम्यान चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी देखील मोठा वाद निर्माण झाला होता. कोकणात सर्वाधिक 162 गाड्या मध्य रेल्वे चालवणार आहे. मात्र याबद्दल मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रक काढून आमचे नियोजन झाले असून राज्य सरकारनेच अंतिम परवानगी न दिल्याने कोकणातली गाड्या रखडल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे वाद निर्माण झाला आणि अखेर 15 ऑगस्टपासून गाड्या सुरू करा, असे आदेश राज्य सरकारने रेल्वेला दिले.
एकीकडे एसटीने जायचे असेल तर कोविड-19 चाचणी करणे बंधनकारक केल्याने एसटीने जाणारा प्रवासी वर्ग कोकणात जाणाऱ्या या विशेष गाड्यांकडे वळेल असे राज्य सरकारला वाटत होते मात्र तसे झाले नाही. रेल्वे सुटणार की नाही याबाबत साशंकता असल्याने, कुणी खाजगी बसने कुणी खाजगी वाहन करून तर कुणी एसटीने कोकणात पोहोचले आहेत. त्यामुळे गणपती विशेष गाड्यांना यावर्षी प्रतिसाद मिळत नाही.
गणपती विशेष गाड्या प्रतिसाद न मिळण्याची काही कारणं आहेत. या गाड्या ज्या आता सोडण्यात आलेल्या आहेत त्या एक महिनाभर आधीपासून नियोजन करून सोडले असत्या तर चाकरमानी रेल्वेतून गावी पोहोचला असता. दुसरे कारण आता जर गावी गेले कारण क्वॉरंटाईनचे दिवस संपेपर्यंत गणपतींचे विसर्जन होईल. त्यामुळे जाऊन फायदा होणार नाही. जर श्रमिक स्पेशल ट्रेन ने इतर राज्यातील प्रवाशांना मोफत सोडण्यात येते तर आपल्याच राज्यातील आपल्याच लोकांना पैसे भरून प्रवास का असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व कारणांमुळे विशेष गाड्या सोडूनही चाकरमानी त्यांच्याकडे फिरकला नाही. त्याचा खूप मोठा तोटा रेल्वेला सहन करावा लागणार आहे.
कोकणी माणसा कोरोनाक घाबरणारी नाय, गणपती इले की गावी जाऊचा, इतकाच त्यांका माहीत, यावर्षी पण जातले होते गावाक पण सरकार नी घोळ केलो त्यामुळे चाकरमान्यांची पंचाईत झाली, पण कोकणी माणसा कोणाक दोष देऊचे न्हाय, उलट त्या गणपती कडे गाऱ्हाना घालतील, बा देवा महाराजा, पुढल्या वर्षी तरी या सरकारला वाईज लवकर जाग येऊ दे रे महाराजा!!!
Konkan Special Railway | कोकणात जाणारी गणेशोत्सव स्पेशल ट्रेन चक्क रिकामी! 18 डब्ब्यांमध्ये केवळ 62 प्रवाशांचं बुकिंग