(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तारापूर एमआयडीसीतील कंपन्यांच्या अपघातांना जबाबदार कोण? कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर, प्रशासनाचे दुर्लक्ष कायम
गेल्या वर्ष भरात झालेले अपघात, स्पोट, वायू गळती आणि प्रदूषण प्रकरणात हरित लवादाने उगारलेल्या दट्ट्यामुळे तारापूर एमआयडीसी चर्चेचा विषय बनली आहे.
मुंबई : तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील आरती ड्रग्स या कारखान्यात गुरुवारी ग्लास कंडेन्सर फुटल्याने झालेल्या अपघातात एक कामगार जखमी आहे. त्याला उपचारासाठी बोईसरच्या तूंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा तारापूर एमआयडीसीतील कंपन्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कंपन्यांमध्ये होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. गेल्या वर्ष भरात झालेले अपघात, स्पोट, वायू गळती आणि प्रदूषण प्रकरणात हरित लवादाने उगारलेल्या दट्ट्यामुळे तारापूर एमआयडीसी चर्चेचा विषय बनली आहे
तारापूर एमआयडीसी मधील प्लॉट क्र टी- 150 मधील आरती ड्रग्स या कंपनीत गुरुवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास नवीन उत्पादन प्रक्रियेसाठी ग्लास कंडेन्सरची सफाई करण्याचे काम सुरू होते.यावेळी ग्लास कंडेन्सरमध्ये आग लागली आणि कंडेन्सर फुटून अपघात झाला.या अपघातात एक कामगार जखमी झाला. अभय सिंग वय. 22 असे कामगाराचे नाव असून त्याच्यावर बोईसर येथील थूंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फॅक्टरी इन्स्पेक्टरचे दुर्लक्ष
तारापूर एमआयडीसी मधील कंपन्यांची सुरक्षितता बघण्याचे काम फॅक्टरी इन्स्पेक्टर करतात. परंतु नेहमीच घडणाऱ्या घटनांनी घटनांमुळे फॅक्टरी इन्स्पेक्टर खरोखरच इन्स्पेक्शन करतात का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मिळालेल्या माहिती नुसार येथील कारखान्याची तपासणी वेळच्या वेळी होत नाही. तारापूर एमआयडी मध्ये 1 हजार 236 कारखान्यांच्या इन्स्पेक्शन साठी फक्त दोन फॅक्टरी इन्स्पेक्टर आहेत. हे इन्फेक्टर वर्षभर कंपनीच्या तपासणीसाठी जातच नसल्याचे बोलले जात आहे.
रासायनिक कंपन्यांना सर्वाधिक धोका
दोन वर्षात या भागात झालेल्या स्फोटात रासायनिक कंपन्यामध्ये झालेल्या स्फोटाची संख्या जास्त आहे. याबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालयाच्या कार्यालयात यसंपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
गेल्या दोन वर्षात झालेले अपघात
8 मार्च 2018 - ई प्लॅन्टमध्ये असलेल्या नोवा फेम स्पेशालिटी कंपनीमध्ये भयानक स्फोट होऊन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर 13 जण जखमी
8 सप्टेंबर 2018 - यूपीएललि या कंपनीला ब्रोमीन या रसायनांच्या गळतीमुळे झालेल्या अपघातात चार कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एका कामगारांचा मृत्यू झाला होता.
12 ऑक्टोबर 2018 - टी झोन मधील लुपिन लि. कंपनी समोर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे शेकडो चिमण्यांचा मृत्यू झाला.
20 जानेवारी 2019 - रामदेव केमिकल्स या कंपनीतील स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला.
27 जानेवारी 2019 - साळवी केमिकल्समध्ये पेटते सॉल्व्हट अंगावर पडल्याने 1 गंभीर व 6 कामगार जखमी झाले.
मार्च, एप्रिल व मे महिन्यात अनुक्रमे मे के.सी. काटा, मंधना व डी. सी टेक्स या कंपन्यामध्ये प्रत्येकी एक असा कामगाराचा मृत्यू झालेला आहे.
4 मे 2019 - बजाज हेल्थकेअर, युनियन पार्क केमिकल, नोवासन केमिकल कारखान्यात तर 14 मे 2019 आरती ड्रग्ज या कारखान्यांमध्ये झालेल्या वायूगळतीत जवळपास 45 कामगारांना बाधा झाली होती.
12 मे 2019 - स्क्वेअर केमिकल या कंपनीत वायुगळती होऊन कारखाना व्यवस्थापकासह तीन कामगारांचा बळी गेला. या कामगारांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनाही या विषारी वायूची बाधा झाली होती.
24 मे 2019 - करीगो ऑगॅनिक्स या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट होऊन 5 किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरला.
30 ऑगस्ट 2019 - औषध निर्मिती करणाऱ्या एसएनए हेल्थकेअर या कारखान्यात वायुगळती होऊन सुपरवायझरचा मृत्यू झाला.
एप्रिल 2020 - गॅलॅक्सी कंपनीत झालेल्या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला होता.
160 कोटीचा दंड
तारापूर मधील कंपन्यांना हरित लवादाने नेमलेल्या समितीने प्रदूषणासाठी 102 कंपन्यांना 160 कोटींचा दंड ठोठावला. यामध्ये सर्वाधिक दंड आरती ड्रग्स, मोल्ट्स रिसर्च लॅबरोटरी या कारखान्यांना ठोठवण्यात आला.