Mamata Banerjee Mumbai Visit : दीदींचं पॉवर पॉलिटिक्स! उद्या 'सिल्वर ओक'वर शरद पवारांसोबत भेट
West Bengal CM Mamata Banerjee Mumbai Visit : 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याच्या दृष्टीने या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जात आहे.
West Bengal CM Mamata Banerjee Mumbai Visit : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्या त्यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishekh Banerjee) यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. उद्या 1 डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी दुपारी 3 वाजता शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्व्हर ओकवर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.
ममता बनर्जी टीएमसीचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे त्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागांचा दौरा करत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना ममता बॅनर्जी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तर उद्या ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. तर उद्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याच्या दृष्टीने या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जात आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अधिकृत माहिती दिली होती. ममता बॅनर्जी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितलं. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस भाजपविरोधातील मोठा पक्ष असेल, असेही घोष म्हणाले. मुंबई भेटीत ममता बॅनर्जी काही उद्योगपतींसोबतही भेटी घेणार आहे. पश्चिम बंगालमध्ये व्यावसाय वाढीसाठी ही भेट असल्याचे बोललं जात आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधील पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिली जाणार जाईल. गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाममध्येही निवडणुकीत लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतलाय.
दरम्यान, सोमवारी कोलकातामध्ये झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या वर्किंग कमेटीच्या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय विस्ताराच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. बैठकीत हे ठरलं की, पक्ष घटनेत बदल करण्यापासून ते राष्ट्रीय स्तरावर भाजपला घेरण्यापर्यंत सर्व प्रकारची पावले उचलली जातील. वर्किंग कमिटीच्या सदस्यांची सध्याची संख्या 21 असून ती वाढवण्यात येण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.
तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्त्वासाठी ही भेट महत्त्वाची
ऑगस्ट महिन्यात ममतांनी पहिला मोठा दिल्ली दौरा आखला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट टाळली होती. विशेष म्हणजे संसद अधिवेशनाच्या निमित्तानं त्यावेळी शरद पवार दिल्लीत होते. पण त्यावेळी अरविंद केजरीवाल, कनिमोळी यांची भेट घेणाऱ्या ममतांनी पवारांची मात्र भेट घेतली नव्हती. तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वासाठी पवारांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. या पार्श्वभूमीवर या दोघांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे. ममता मुंबईसोबतच मोदींच्या वाराणसीवरही लक्ष ठेवून आहेत. लवकरच आपण वाराणसीत जाणार असल्याचं ममतांनी घोषित केलं आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मदत करायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ममतांप्रमाणेच केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही विस्ताराची मोठी योजना आखतोय. केजरीवाल गोवा, पंजाब, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये विस्ताराची मोठी योजना आखत आहेत. त्यामुळे आता 2024 च्या या शर्यतीत नेमकं कोण पुढे येणार आणि कोण भाजपला टक्कर देऊ शकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा