मर्यादीत संख्येत पायी दिंडीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी; गुरुवारपर्यंत मुख्यमंत्री निर्णय घेणार : अजित पवार
यंदाच्या आषाढी सोहळ्यात मर्यादीत संख्येत पायी पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी : वारकरी संप्रदाय.वारीबद्दल आज निर्णय झालेला नाही. कॅबिनेटमधे यावर चर्चा होईल आणि मुख्यमंत्री याबाबतचा अंतिम निर्णय घेतील : उपमुख्यमंत्री अजित पवार.
मुंबई : आषाढी वारी सोहळ्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत वारकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत वारकऱ्यांनी जास्तीत जास्त पाचशे आणि कमीतकमी शंभर व्यक्तींच्या उपस्थितीत पायी वारी सोहळा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. वारीमध्ये अनेक घटक सहभागी होत असतात. त्यामुळे वारीबद्दल आज निर्णय झालेला नाही. कॅबिनेटमधे यावर चर्चा होईल आणि मुख्यमंत्री याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय.
आषाढी वारी संदर्भात राज्य सरकारने 9 जूनपर्यंत याबाबतचा निर्णय जाहीर करावा. वारीच्या मार्गात येणाऱ्या गावकऱ्यांशी देखील संपर्क करण्यात आला आहे. मात्र, सरकारचा निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया वारकऱ्यांचे प्रतिनिधी भाऊसाहेब गंभीरे आणि अशोक सावंत यांनी दिला आहे. तर वारकऱ्यांनी मर्यादित लोकांमध्ये वारी पायी व्हावी अशी मागणी केली आहे. आजच्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना बुधवारपर्यंत सादर केला जाईल. बुधवार किंवा गुरुवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वारी संदर्भात निर्णय घेतील, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलीय.
काय आहे वारकऱ्यांची मागणी?
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे.
यंदा 20 जुलै रोजी आषाढी एकादशी असून 1 जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे. यातच वारकरी संप्रदायाने यंदा अतिशय मर्यादित स्वरूपात वारकऱ्यांना पायी पालखी सोहळ्यासाठी परवानगी द्यावी, आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून पायी पालखी सोहळा पंढरपूरपर्यंत आणू अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.