विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांना अन्नातून विषबाधा; दोघांचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरु
Virar Food Poisoning : विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोन लहान मुलांचा मृत्यू असून तिघांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
![विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांना अन्नातून विषबाधा; दोघांचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरु Virar food poisoning Five children of same family poisoned by food in Virar Two died three are undergoing treatment विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांना अन्नातून विषबाधा; दोघांचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरु](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/14/50c5bcb71faf86cd79dd33db8355a8051660451227413322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Virar Food Poisoning : विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर तिघांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी घडली आहे. पाच जणांपैकी पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर दोन लहान मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, अशी माहिती मांडवी पोलिसांनी दिली आहे. एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा झाली आहे. पाचही मुलं रात्री जेवून झोपले. त्यानंतर सकाळी पाचही चिमुरड्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाच जणांपैकी दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे.
विरार पूर्व टोकरे ग्रामपंचायत टोकरे पाडा येथे घडली आहे. विरार पूर्व येथील टोकरे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या भोयपाडा येथे अश्फाक खान आणि रजियाबानू खान हे आपल्या पाच मुलांसह राहतात. शुक्रवारी राञी साडेनउच्या सुमारास हे सर्व कुटुंब जेवल्यानंतर झोपले. माञ शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक मुलांची तब्येत बिघडली. यातील नऊ वर्षाचा मुलगा आसिफ खान आणि आठ वर्षाची मुलगी फरीफ खान यांना पहाटे चारच्या सुमारास उलटी आणि पोटात दुखू लागल्याने विरारच्या भाताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखलं केलं होतं. त्यानंतर दहा वर्षांची मुलगी फराना खान, चार वर्षाचा मुलगा आरीफ खान आणि तीन वर्षाचा मुलगा साहिल खान यांना तुळींजच्या पालिका रुग्णालयात दाखल केले. माञ यातील आसिफ आणि फरीफ या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या मांडवी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान एकाच घरातील पाच लहान मुलांना विषबाधा झाल्याने परिसरात घबराटीचं वातावरण आहे. दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतं आहे. मांडवी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दोन मृत लहान मुलांचा शवविच्छेधन अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येईल. सध्या इतर तीन मुलांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)