Mumbai Bank Scam : तिघांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, किती वेळा बोलावलं तरी चौकशीला जाणार : प्रवीण दरेकर
Pravin Darekar on Mumbai Bank Scam : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. यापूर्वी 4 एप्रिलला दरेकर यांची चौकशी करण्यात आली होती.
Pravin Darekar on Mumbai Bank Scam : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. यासंदर्भात प्रवीण दरेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'कितीही वेळा बोलावलं तरी चौकशीला यायला आपण तयार असून केवळ छळायच्या उद्देशाने चौकशीसाठी बोलावलं आहे.' यापूर्वी 4 एप्रिल रोजी दरेकर यांची याच प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांची दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आपण अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचंही प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे. दरेकरांनी यावेळी सांगितलं की, ''विरोधकांनी एकत्रितपणे हातमिळवणी करून केलेलं हे षड्यंत्र आहे. मी नाना पटोले, भाई जगताप आणि धनंजय शिंदे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. या संदंर्तातील पत्र त्या तिघांनाही पाठवणार आहे. कारण मुंबई बँकेचा नफा 15 कोटी असून आणि दोन हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात येत आहे. आपल्या प्रसिद्धीसाठी एखाद्याची बदनामी करणं योग्य नाही.''
यापूर्वीच्या चौकशीत काय झालं?
4 एप्रिल रोजी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली होती. दुपारी 12 वाजता सुरु झालेली चौकशी दुपारी 3 वाजता संपली. "पोलिसांनी पाहिजे असलेली सगळी माहिती दिली. पण पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचं प्रत्येक क्षणी जाणवत होतं," अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली. तसंच पोलिसांनी अनेक वेळा उलटसुलट आणि तेच तेच प्रश्न विचारुन भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. शिवाय चौकशी सुरु असताना पोलीस अधिकाऱ्यांना सहा-सात वेळा फोन आले, पण कोणाचे फोन आले ते कळलं नाही, असंही दरेकर यांनी म्हटलं होतं.
काय आहे प्रकरण?
प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Coronavirus Cases Today : देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये मोठी घट, गेल्या 24 तासांत सहा जणांचा मृत्यू, नवीन 929 कोरोना रुग्णांची नोंद
- Viral Video : धक्कादायक! इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाचे दोन तुकडे, तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
- LSG vs RR : वडील सुनील शेट्टीसोबत मॅच बघायला पोहोचली लेक अथिया, केएल राहुल शुन्यावर आऊट झाल्यावर फॅन्सनी केलं ट्रोल, पाहा व्हायरल मीम्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha