(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dinkar Raikar: ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली
Dinkar Raikar passes away : ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचे आज पहाटे निधन झाले. रायकर हे तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय होते.
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचे आज पहाटे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. रायकर हे तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि कोरोना झाला होता. डेंग्यू बरा झाला मात्र लंग्ज इन्फेक्शन 80 टक्के होते. नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
दिनकर रायकर हे लोकमत वृत्तपत्राचे समन्वयक संपादक होते. सक्रिय मराठी पत्रकारितेत त्यांचं दीर्घकाळ योगदान राहिलं. गेली काही वर्षे त्यांनी दैनिक लोकमतमध्ये समूह संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली.
रायकर यांची गुरुवारी रात्री आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र पहाटे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रायकर यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. दैनिक लोकसत्तामधून निवृत्त झाल्यावर त्यांनी लोकमत समूहामध्ये संपादकपदाची जबाबदारी सांभाळली.
रायकर हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच मुंबई प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष देखील होते. त्यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्काराने रायकर यांना सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रायकर यांना श्रद्धांजली
पत्रकारितेच्या क्षेत्रात मुल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरीत्या बजावली. त्यामुळे मराठी पत्रकारितेच्या मुल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक हरपला- उपमुख्यमंत्री अजित पवार
"ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. राज्याच्या विकासप्रक्रियेत महत्वाचं योगदान दिलं. युवा पत्रकारांना मार्गदर्शन केलं. प्रोत्साहन दिलं. पत्रकारितेत तरुणांच्या पिढ्या घडवल्या. त्यांचं निधन ही राज्याच्या पत्रकारिता, साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मंत्र्यांसह नेतेमंडळींकडून रायकर यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ पत्रकार, @lokmat समूहाचे माजी समूह संपादक दिनकर रायकर यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद व धक्कादायक आहे. गेल्या ५ दशकातील महाराष्ट्राच्या राजकीय पटलांवरील घटनांचे ते साक्षीदार होते. मराठी पत्रकारितेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/MnAYJAnwDV
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 21, 2022
ज्येष्ठ संपादक दिनकर रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! सध्या ते @lokmat चे समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी @IndianExpress आणि @LoksattaLive मध्ये प्रदीर्घ काळ पत्रकारिता केली. त्यांच्या निधनाने एका अजातशत्रू पत्रकार आपल्यातून गेला आहे.
— Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) January 21, 2022
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/38zYhLb8Ku
ज्येष्ठ पत्रकार, 'लोकमत'समुहाचे माजी समूह संपादक दिनकर रायकर यांच्या निधनाने पत्रकारितेने एक उत्तुंग नेतृत्व,उत्तम माध्यम प्रशासक आणि वैचारिक दिशादर्शक गमावला आहे. त्यांचे कुटूंबिय,मित्र परिवार व वाचक यांच्या दुःखात मी सहभागी आहे!भावपूर्ण श्रद्धांजली.@lokmat @DinkarRaikar pic.twitter.com/sFYrHZr7pL
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) January 21, 2022