Conversion Case: वसईतील कथित धर्मांतर प्रकरणात अटक झालेला आरोपी हिंदू, पोलिसांच्या तपासातून उघड
Conversion Case: कथित धर्मांतर प्रकरणात आता नवे खुलासे होत असून वसई पोलिसांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Conversion Case: गाझियाबादमधील कथित धर्मांतर (Conversion) प्रकरणाचे महाराष्ट्राशी कनेक्शन समोर आल्यानंतर वसईतील माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी मोसिन मोहम्मद शेख या आरोपीला अटक केली आहे. परंतु आता या प्रकरणात अनेक नवे खुलासे आता होत आहेत. धर्मांतराच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आलेला आरोपी हिंदू असल्याचं पोलिसांच्या तपासातून उघड झालं आहे.
या आरोपीचे पाहिले नाव कुमचंद केशवलाल सोनी असे होते. परंतु धर्म परिवर्तन केल्यानंतर त्याने आपलं नाव मोसिन मोहम्मद शेख असं ठेवलं. हा मूळचा राजस्थान येथील राहणारा असून तो 2004 मध्ये मुंब्रा या परिसरात आला होता. त्यावेळी त्याचं नजमा या मुस्लिम मुलीशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर त्याने हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश केला.
वसईतील हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मामध्ये परिवर्तीत झालेल्या राजेश जानी यांच्या मुलाने केलेल्या तक्रारीवरून मोसिम याच्यावर वसईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. वसईच्या साई नगर येथील राजेश जानी हे बेपत्ता झाल्या नंतर 26 मे रोजी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मोसिम शेख याने राजेश यांच्या कुटुंबाला आणि मुलाला फोन करुन 'राजेश जानी यांनी इस्लाम धर्म स्विकारला केला आहे' असं सांगितलं. तसेच त्याने 'माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, हिंदू देवीदेवता विषयी अवमानकारक बोलून आणि राजेश जानी यांच्या मनात भीती निर्माण होईल अशी काही वक्तव्य केली.' त्याप्रकरणी जानी यांच्या कुटुंबियांनी माणिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी मोसिन याच्यावर भारतीय कलम 295 (अ) सह मनुष्यबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. या आरोपीला आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता 17 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
गाझियाबाद पोलिसांनी व्हिडीओ गेम्सच्या माध्यमातून कथित धर्मांतर झाल्याचा खुलासा केल्यानंतर त्याचं कनेक्शन महाराष्ट्राशी जोडलं गेलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी शहानवाज याला ठाणे आणि गाझियाबाद पोलीसांनी अलिबागमधून अटक केली. त्यानंतर वसईमधून देखील एकाला अटक करण्यात आली होती. आता रोज नवीन खुलासे यामध्ये होत असल्याने या प्रकरणाला आता कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु या प्रकरणात माणिकपुर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला आहे.