(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत 'रोड शो', मुकेश अंबानींनाही भेटणार
Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाच जानेवारी रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून देशांतर्गत रोड शोची सुरुवात करतील.
Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पाच जानेवारी रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून देशांतर्गत रोड शोची सुरुवात करतील. नोएडा येथे आगामी फिल्म सिटीच्या संदर्भात देशातील आघाडीचे टायकून आणि बँकर्स तसेच प्रमुख चित्रपट व्यक्तिमत्त्वांची भेट घेतील. संभाव्य गुंतवणूकदारांना उपलब्ध संधी आणि उत्तर प्रदेशातील अनुकूल व्यावसायिक वातावरणाची ओळख करून देण्यासाठी देशातील नऊ शहरांमध्ये रोड शो आयोजित केले जातील.
रोड शो आणि शीर्ष उद्योगपती आणि बँकर्स यांच्या भेटीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याशी शिष्टाचार भेट घेतील. यानंतर ते हॉटेल ताजमध्येच विविध बँकांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 ते दोन या वेळेत मुख्यमंत्री जीआयएस रोड शोमध्ये सहभागी होतील. काही तास चालणाऱ्या या रोड शोमध्ये विविध उद्योग समुहांच्या प्रतिनिधींना उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. त्यांना यूपीमध्ये व्यवसाय करण्यास सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) याबद्दल माहिती दिली जाईल. संध्याकाळी सीएम योगी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांची भेट घेणार आहेत.
उच्चर प्रदेशला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूकदारांना ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (जीआयएस २०२३) मध्ये आमंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आणि त्यांच्या मंत्री आणि अधिकार्यांच्या टीमद्वारे यूपीमध्ये मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मुख्यमंत्री 17 बैठका घेणार
सीएम योगींच्या कार्यक्रमवेळा पत्रकानुसार, रोड शोच्या आधी आणि नंतर मुख्यमंत्री विविध उद्योगपतींसोबत वन टू वन बैठक घेणार आहेत. ही बैठक बिझनेस टू गव्हर्नमेंट (बीटूजी) या तत्त्वावर असेल. वेळापत्रकानुसार एकूण 17 बीटूजी बैठका होणार आहेत. रोड शोपूर्वी ते आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, पिरामल एंटरप्राइझ लि.चे अध्यक्ष अजय पिरामल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे एमडी सज्जन जिंदाल, टोरेंट पॉवरचे एमडी जिनल मेहता आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांची भेट घेतील. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन, पार्ले अॅग्रोचे चेअरमन प्रकाश चौहान आणि एमडी शवना चौहान, अदानी पोर्ट्स लि.चे करण अदानी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सीईओ मुकेश अंबानी आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांच्याशीही ते चर्चा करतील.