रस्त्यांवरची उघडी मॅनहोल्स मृत्यूचा सापळा, तुटकी मॅनहोल्स तात्काळ बंद करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
Manhoes: पूर्व दृतगती महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील तुटकी मॅनहोल्स तात्काळ बंद करून सोमवारी अहवाल सादर करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई: रस्त्यांवरची उघडी मॅनहोल खोल मृत्यूचा सापळा बनू लागलीत, असं मत व्यक्त करत हायकोर्टानं मुंबई महापालिकेवर चांगलेच ताशेरे ओढलेत. प्रसंगी उघड्या मॅनहोलमध्ये पडून एखाद्याचा मृत्यू नाही झाला तरीही त्याला गंभीर दुखापत होऊ शकते. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड घाटकोपर दरम्यानच्या सर्विस रोडवरील उघडी मॅनहोल सोमवारपर्यंत तातडीनं बंद करा, त्यासाठी आमच्या आदेशांची वाट पाहू नका असे स्पष्ट निर्देश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठानं दिले आहेत.
काय आहे याचिका?
मुंबईसह राज्यभरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते व त्यावरील खड्डयांची तक्रार नागरिकांना नोंदवता यावी, म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने 12 एप्रिल 2018 रोजी खड्यांबाबत स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. मात्र, राज्य सरकार, पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थानी कोणतीही पूर्तता न केल्यानं वकील रुजू ठक्कर यांनी हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी हायकोर्टात सुनावणी पार पडली. वसई-विरार पालिकेच्या हद्दीतील उघड्या मॅनहोलमुळे तिथं एका महिलेचा मृत्यू झाल्याबाबत हायकोर्टानं विचारणा केली असता अनेक मॅनहोल्स उघडीच असल्याची कबुली वसई-विरार पालिकेनं हायकोर्टात दिली होती. मात्र हे मॅनहोल फक्त तीन फूटच खोल असल्याचा विचित्र दावा त्यांच्याकडून केला गेला. पालिकेच्या दाव्यावर हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त करत उघडी मॅनहोल मृत्युचे सापळे नाहीत का? असा सवलाही विचारला होता.
दरम्यान मुलुंड ते घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गावरील जोड रस्त्यावरच्या दोन्ही बाजूंना तीनशेहून अधिक उघडी मॅनहोल असल्याकडे याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाचं लक्ष वेधलं. त्याबाबत खंडपीठाने पालिकेकडे विचारणा केली असता याचिकाकर्त्यांच्या दाव्यांची शहानिशा करण्यात येईल आणि उघडी मॅनहोल सुरक्षित केली जातील, असे आश्वासन पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्य़ायालयाला दिले. त्याची दखल घेत मॅनहोल तातडीने बंद करून सोमवारपर्यंत अहवाल सादर करा, या आदेशांटं पालन न झाल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल असा तोंडी इशाराही हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला आहे.
मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाची पालिकेला आठवण
मुंबईतील 20 निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने तीन महिन्यात बुजवले जातील, असं आश्वासन मुंबई पालिका आयुक्त इक्बलसिंह चहल यांनी हायकोर्चाला दिलं होतं. रस्त्यांची दुरुस्ती आणि सरसकट सारे रस्ते पालिकेच्या ताब्यात दिल्यास त्याचे तीन वर्षांत काँक्रिटीकरण करण्याचं आश्वासनही देण्यात आल्याची आठवण मुख्य न्यायमूर्तींनी पालिकेला करून दिली. काम सुरू असल्याची माहिती पालिकेच्यावतीनं दिली गेली. त्यावर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाबाबत निविदा रद्द झाल्याचं वृत्तपत्रातून माहिती मिळाल्याबद्दल न्यायालयानं विचारलं. तेव्हा आता रस्त्यांबाबत आमच्याकडून मुदतवाढीची अपेक्षा करू नका, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं.