(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा : 'सामना'च्या अग्रलेखातून मागणी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा, या मथळ्याखाली सामनाच अग्रलेख लिहिण्यात आला आहे. तसंच 'साठी'ही सुरुवात, मोठ्या राजकारणाचा आरंभ असंही म्हटलं आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (27 जुलै) वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांनी आज वयाची साठी पूर्ण केली आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा,' अशा मथळ्यासह आज सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.
"फक्त सहा महिन्यांच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नुसते लोकप्रिय ठरले नाहीत तर देशात अव्वल नंबर पटकावून पुढे आले. गंभीर विषयाचा, शत्रूचा अभ्यास करायचा व मगच घाव घालायचा या पक्क्या तयारीनेच ते मैदानात उतरतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले सर्व राजकीय विषाणू उडून धुळीतून वाहत गेले," अशा प्रकारे उद्धव ठाकरेंचं कौतुक करण्यात आलं आहे.
Happy Birthday Uddhav Thackeray | वडिलांकडून राजकारणाचे धडे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!
गाडीचं स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती; मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सूचक फोटो ट्वीट
'साठी'ही सुरुवात, मोठ्या राजकारणाचा आरंभ उद्धव ठाकरे यांना कुटुंबाची महान परंपरा लाभली आहे. त्या परंपरेचा वारसा हा राजकीय तितकाच प्रबोधनाचा आहे, सामाजिक परिवर्तनाचा आहे. सह्याद्रीच्या टोकदार अभेद्य कड्याप्रमाणे त्यांचे नेतृत्त्व आज देशाचे शक्तिस्थान ठरले आहे. सह्याद्रीच्या कड्याने आता हिमालयाचे नेतृत्त्व करण्यासाठी पुढची चाल करावी. 'साठी'ही सुरुवात आहे, मोठ्या राजकारणाचा आरंभ आहे. महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे. आपणांस उदंड, निरोगी, शक्तिवान दीर्घायुष्य लाभो.
याआधीही अशाच प्रकारचे संकेत सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आले होते. राम मंदिर, जीएसटी, नोटाबंदी, केंद्रातल्या अनेक निर्णयांवर योग्यवेळी योग्य भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे केंद्रात 19 खासदार आहेत, केंद्रात भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेनेकडे एक मंत्रीपद होतं. महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, मुख्यमंत्रीपद सांभाळताना उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार का? सत्तापालट, कोरोनाच्या संकटाशी हिंमतीने तोंड देणारे आणि महान पित्याचा वारसा असणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जातं. त्यामुळे आता पुढे काय काय घडतंय हे पाहावं लागणार आहे.
सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा... उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरावं : सामना