कट्टर शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंकडून अखेरचा निरोप, ठाकरे कुटुंबीयांनी घेतली घोसाळकरांची भेट
Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे हे बोरिवलीतील औंदुबर निवास येथे जाऊन घोसाळकर कुटुंबीयांची भेट घेतली.
मुंबई: राज्यातील सत्तांतरानंतरही ठाकरे घराण्याशी इमान राखून असलेल्या घोसाळकर कुटुंबातील अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अभिषेक घोसाळकर हे मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक होते. मॉरिस नोरोन्हा या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर अभिषेक यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिकडे पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर बोरिवली आणि दहिसर परिसरातील ठाकरे गटाची ताकद कायम राखण्यात विनोद घोसाळकर आणि अभिषेक घोसाळकर यांचा मोठा वाटा होता. या परिसरात घोसाळकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर स्थानिक शिवसैनिकांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे. घोसाळकर कुटुंबीय हे मातोश्रीच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे सहकुटुंब घोसाळकर यांच्या बोरिवलीतील औंदुबर या निवासस्थानी पोहोचले. याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. उद्धव ठाकरे यांनी पोलीस उपायुक्तांकडून या संपूर्ण घटनेची माहितीही घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. आता थोड्याचवेळात अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अभिषेक घोसाळकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बोरिवलीच्या औंदुबर निवास येथे हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. अभिषेक यांना निरोप देताना त्यांची पत्नी आणि लहान मुलीला अश्रू अनावर झाले होते. अभिषेक यांची पत्नी आणि लहान मुलीला धाय मोकलून रडताना पाहून उपस्थित शिवसैनिकांचे मन गलबलून आले.
फेसबुक लाईव्हनंतर नेमकं काय घडलं?
मॉरिस दहिसर-बोरिवली परिसरात एनजीओ चालवायचा. परिसरात मॉरिसची स्वयंघोषित नेता म्हणून ओळख होती. वर्षभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता.अभिषेक घोसाळकरांनी नोरोन्हा विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी घट्ट मैत्री देखील झाली होती. गुरुवारी रात्री दोघं सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह संपत आलं असताना मॉरिसनं गोळ्या झाडल्या.
आणखी वाचा
गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, घोसाळकर गोळीबारप्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया