Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे संकेत, कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेणार
Uddhav Thackeray on BMC Election : आपली तयारी झाली असं दिसेल त्यावेळी कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार निर्णय घेणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले असून शिवसैनिकांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेणार असं सांगत त्यांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी तुम्ही भ्रमात राहू नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शाह किस झाड की पत्ती असं म्हणत त्यांनी अमित शाहांना टोला लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
महापालिकेसाठी स्वबळाचे संकेत
विधानसभेत अनपेक्षितपणे धक्का बसल्यानंतर आता ठाकरे गटाने महापालिकेवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. कोणत्याही परिस्थितीत सेनेचा हा गड कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. त्याचसंबंधी ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.
सगळ्यांचे म्हणणं आहे की एकटं लढा. तुमच्यात ती ताकद आहे? अमित शाह यांना ताकद दाखवणार आहात? अजून निवडणूक जाहीर झाली नाही. मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्यावेळी मला दिसेल तुमची तयारी झाली आहे त्यावेळी कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेईन.
निष्ठावान शिवसैनिकांनी सांगितल्यास पक्षप्रमुख पद सोडणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आपण हिंदुत्त्व सोडलं नाही याचा पुनरुच्चारदेखील उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केला.
आधी तुमच्या झेंड्यातील हिरवा रंग काढा
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवा, मगच आम्हाला हिंदुत्व शिकवा असं उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना थेट आव्हान दिलं. तर जय श्रीराम म्हणा, पण आधी जय शिवराय देखील बोला असं आवाहनही त्यांनी केलं.
अमित शाहांवर टीका
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांसह एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. पाठीत खंजीर खुपसल्यास वाघनखं काढणार असं ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, "अमित शाहंनी संपूर्ण यंत्रणा वापरुन अडीच वर्षे सत्ता आपल्यावर लादली. सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राताची सत्ता हातात असेल तर दिल्लीची सत्ता हातात असते. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शाह किस झाड की पत्ती."