एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंच्या फोननंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक

मुंबई : वेगळा विदर्भ विरुद्ध अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने वेगळीच चाल खेळली आहे. कारण 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन परतलेले शिवसेनेचे मंत्री आता थेट काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वत: पृथ्वीराज चव्हाणांशी फोनवरुन चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या भाषा करणाऱ्या भाजपविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपण अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे विधानभवनातून थेट ‘मातोश्री’कडे रवाना झाले होते. इथे त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेनेने रणनीती ठरवली. काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेची भाजपला कोंडीत पकडण्याची ही खेळी असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या
मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : फडणवीस
मुख्यमंत्र्याच्या निवदेनानंतर शिवसेना मंत्री 'मातोश्री'कडे रवाना
'वाघाचं काय झालं, शेळी झाली शेळी झाली'
आणखी वाचा























