Uddhav Thackeray meets Devendra Fadnavis: तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील विधानभवनातील भेटीची जोरदार चर्चा. दोन्ही नेते लिफ्टसाठी एकत्र थांबले होते, तेव्हा दोघांमध्ये जुजबी संवाद झाला.
मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेले राज्य विधिमंडळाचे अधिवेशन हे सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात राजकीय घटनांचा जबरदस्त सिक्वेन्स पाहायला मिळाला. सुरुवातीला भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमधील भेटीची चर्चा असतानाच कोणालाही अपेक्षित नसलेली आणखी एक घटना घडली. विधानभवनाच्या लिफ्टजवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली. यावेळी उभय नेत्यांमध्ये जुजबी चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि फडणवीस या दोघांनीही लिफ्टनेही एकत्रच प्रवास केला. त्यावेळी लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं, याचा तपशील भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी समोर आणला आहे. प्रवीण दरेकर हेदेखील उद्धव आणि फडणवीस यांच्यासोबत लिफ्टमध्ये होते.
प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राजकारणात आपण राजकीय शत्रू असू, पण सदासर्वकाळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्र आणि उद्धवजी आले, मिलिंद नार्वेकरही सोबत होते. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहाकडे चाललो होो. लिफ्ट सुरु झाल्यानंतर कोणीतरी बोललं, 'आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं'. त्यावर उद्धवजी ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले, 'याला पहिले बाहेर काढा'. तेव्हा मी बोललो की, 'तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा'. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. उद्धवजी बोलतात तसं नाहीये, त्यांच्या पोटात एक ओठात एक, आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं.
त्यानंतर आम्ही लिफ्टमधून बाहेर पडलो, उद्धव ठाकरे विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. त्यांची मानसिकता विरोधी पक्षात राहायची आहे, ते सत्तेच्या दिशेने आले नाहीत. आम्ही लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर आमचे वेगळे मार्ग दिसून आले आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
उद्वव ठाकरे चंद्रकांत पाटलांना म्हणाले, बसा गप्पा मारूयात
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी दालनात उद्धव ठाकरे आणि अनिल परब उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांतदादांना म्हटले की, बसा गप्पा मारूयात. पण चंद्रकांत पाटील यांना कामाचे कारण देत काढता पाय घेतला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांना विजयाच्या अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्या.
VIDEO: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमध्ये असताना काय घडलं, प्रवीण दरेकरांनी सांगितला किस्सा
आणखी वाचा