मुंबई एटीएसमध्ये जागा रिक्त; अतिरिक्त पोलीस महासंचालकांची फेसबुक पोस्ट चर्चेत
Mumbai ATS : मुंबई दहशतवादविरोधी पथकात दोन 'एसपी' पदाच्या जागा रिक्त आहेत. याबाबतची माहिती देणारी फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे.
Mumbai ATS : सध्या कोर्टातील प्रकरणांमुळे चर्चेत असलेले महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे आणखी एका कारणांमुळे चर्चेत आले आहेत. संजय पांडे यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत दहशतवादविरोधी पथकात पोलीस अधीक्षकपदाच्या दोन जागा रिक्त असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. संजय पांडे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. मात्र, सोशल मीडियाद्वारे त्यांच्याकडून दैनंदिन कामकाजाचा अहवाल सादर केला जातो. त्यामुळे अधिकच चर्चा सुरू आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी म्हटले की, मुंबईत एटीएसमध्ये SP च्या दोन जागा रिक्त आहेत. ATS पोस्टिंग ही एक प्रतिष्ठित पोस्टिंग आहे ज्यात 25% विशेष भत्ता आहे. इच्छुक अधिकारी यांनी थेट ADG-ATS सोबत संपर्क साधू शकतात, असेही त्यांनी म्हटले.
एटीएस प्रमुखांनी राज्य सरकारला पत्र लिहून पथकासाठी अधिक मनुष्यबळाची मागणी केली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एटीएससारख्या प्रतिष्ठित पथकात काम करण्यास वरिष्ठ अधिकारी फारसे उत्सुक नाहीत. पोलीस दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य दहशतवादविरोधी पथकाने मागील काही वर्षात आपली चमक गमावली आहे. काही महत्त्वांची प्रकरणे राष्ट्रीय तपास यंत्रणेने एटीसएसकडून आपल्या हाती घेतली आहेत. यामध्ये काही प्रकरणांची मोठी चर्चा झाली.
एटीएसचे प्रमुख असलेले विनित अग्रवाल हे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. एटीएसचे माजी पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे असलेले पद सुमारे वर्षभरापूर्वी या पदावरील अधिकाऱ्याची बदली झाल्यापासून रिक्त आहे. डीआयजी शिवदीप लांडे यांना २६ नोव्हेंबरला बिहारला पुन्हा पाठवण्यात आले. त्यांच्या रिक्तपदी अद्यापही कोणाचीही वर्णी लागलेली नाही. पदही अद्याप भरलेले नाही. पोलिस अधीक्षकांच्या (एसपी) पदांसाठीही दोन जागा रिक्त आहेत.
विनित अग्रवाल यांनी त्यांच्या युनिटमधील रिक्त पदांवर भाष्य करण्यास नकार दिला. महाराष्ट्र पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र रिक्त पदे लवकरच भरली जातील, असे सांगितले असे 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
फेसबुकवर कामाचा लेखाजोखा
अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय पांडे हे आपल्या दैनंदिन कामाचा लेखाजोखा फेसबुकवर मांडत असतात. दिवसभरात कोणते काम केले, कोणती बैठक झाली, पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने कोणते निर्णय घेण्यात आले आदींची माहिती त्यांच्याकडून दिली जाते. विशेष म्हणजे त्यांच्या या सोशल मीडियावर पोस्टवर माजी पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत असतात.