नोकरीचं आमिष दाखवून पैसे लुबाडणाऱ्या दोघांना अटक: मुंबई पोलिसांची दिल्लीत कारवाई
लोकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवण्यासाठी मोहम्मद आरिफ आणि सुजाहुड यांनी दिल्लीत चक्क कॉल सेंटरच उभारलं होतं. या दोघांकडून विविध कंपन्यांचे 9 मोबाईल फोन, 7 इंटरकॉम फोन, 3 इंटरनेट राऊटर, 2 डेबिट कार्ड, 5 सिमकार्ड, 4 हार्डडिस्क, 3 रजिस्टर इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या.
मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक बेरोजगार नोकरीच्या शोधत आहेत. याचाच फायदा घेत नोकरीचं आमिष दाखवून पैसे लुबाडण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. अशाच एका प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दिल्ली मधून दोघांना अटक केली आहे. मोहम्मद आरिफ आणि सुजाहुड असे या आरोपींनचे नाव असून यांनी पैसे लुबाडण्यासाठी चक्क कॉल सेंटरच उभारलं होत.
लॉकडाउनमध्ये बहुतांश लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या बेरोजगारांकडून ऑनलाइन जॉब सर्च करणं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचाच फायदा या भामट्याने कडून घेतला जात होता. मोठ्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून गरजूंची आर्थिक फसवणूक केली जात आहे.
माटुंगा येथे राहणाऱ्या एका इसमाची नोकरी गेली दुसरी नोकरी शोधण्यासाठी त्याने शाईन डॉट कॉम वर अर्ज केला. मोठ्या कंपनीमध्ये ज्यादा पगाराचे आमिष दाखवून नोकरी लावतो असे सांगून सदर इसमाकडून 39 हजार रुपये घेण्यात आले. मेलवरून सदर इसमाकडून आपला बायोडेटा नोकरीसाठी पाठवण्यात आला होता आणि मेल वरचा संपर्क सुरू होता. पैसे मागण्यासाठी या दोघांनी आपला मोबाईल नंबर शेअर केला आणि मोबाईलवर संभाषण सुरू होऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
मोहम्मद आरिफ आणि सूजाहुड या दोघांवर फिर्यादीने विश्वास ठेवला आणि पैसे भरले. पैसे मिळताच या दोन्ही भामट्यांनी आपला नंबर बंद केला. तसेच मेलवरही रिप्लाय देणं बंद केलं. आपली फसवणूक झाली हे कळतात फिर्यादीने माटुंगा पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला कुठल्याही प्रकारची माहिती सबळ पुरावे नसताना सुद्धा अतिशय चिकाटीने याचा तपास सुरू करत माटुंगा पोलिसांची टीम दिल्लीला पोहोचली. दिल्लीमध्ये पोहचात या दोघांचा शोध घेतला. यावेळी मोहम्मद आरिफ आणि सुजाहुड यांनी लोकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवण्यासाठी चक्क कॉल सेंटरच उभारलं होतं. या दोघांकडून विविध कंपन्यांचे 9 मोबाईल फोन, 7 इंटरकॉम फोन, 3 इंटरनेट राऊटर, 2 डेबिट कार्ड, 5 सिमकार्ड, 4 हार्डडिस्क, 3 रजिस्टर इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या. या वस्तूंचा वापर लोकांना फसवण्यासाठी केलं जात होतं.
या कॉल सेंटरमधून संपूर्ण भारतात कॉल करून गरजू उमेदवारांची फसवणूक होत होती आणि हा कॉल सेंटर उद्ध्वस्त झाल्यामुळे अनेकांची फसवणूक होण्यापासून नक्कीच वाचली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त माटुंगा डिव्हिजन भीमराव इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माटुंगा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह घाटगे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस निरीक्षक भांगले, पोलीस उपनिरीक्षक राजेश गरड,पोलीस शिपाई संतोष पवार, पोलीस शिपाई विकास मोरे या टीमकडून करण्यात आला.