वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक-स्कूटरचा अपघात, पती ठार तर पत्नी गंभीर जखमी
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांना ट्रक ड्रायवर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अपघातानंतर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काही वेळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मुंबई : वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर जोगेश्वरीजवळ ट्रक आणि स्कूटरचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने स्कूटरला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात स्कूटरवरील पती विश्वास मध्यालकर यांना जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. विश्वास मध्यालकर आपल्या पत्नीसोबत स्कूटरवरुन जात होते. दरम्यान जोगेश्वरी फ्लायओव्हरवर एका भरधाव ट्रकने त्यांच्या स्कूटरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर विश्वास यांची पत्नी स्कूटरवरुन दूरवर फेकल्या गेल्या.
मात्र विश्वास यांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. विश्वास यांना ट्रकने जवळपास 20 फूट लांब फरफटत नेलं. अपघातात विश्वास यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीला जखमी अवस्थेत जवळीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांना ट्रक ड्रायवर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अपघातानंतर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काही वेळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
पाहा व्हिडिओ - राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा