बापाकडून चिमुकल्याला बंदूक लोड करण्याचं प्रशिक्षण, व्हिडीओ व्हायरल
वडील आपल्या लहान मुलाला रिव्हॉल्व्हरमध्ये गोळ्या भरायला शिकवत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या व्हिडीओची पडताळणी केली असून व्हिडीओ दिल्लीमध्ये शूट झाल्याचं समोर आलं आहे.
कल्याण : बापाकडून चिमुकल्याला बंदूक लोड करण्याचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ टिटवाळ्यातला असल्याचं समोर आलं.
टिटवाळा येथे राहणारे आदर्श उपाध्याय यांनी हा व्हिडीओ चित्रित केला आहे. उपाध्याय हे टिटवाळ्यात शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी आहेत. काही दिवसांपासून ते दिल्लीत असून तिथेच त्यांनी हा व्हिडीओ चित्रित केला आहे. या व्हिडीओत आपल्या लहान मुलाला ते रिव्हॉल्व्हरमध्ये गोळ्या भरायला शिकवत आहेत.
हा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या व्हॉट्पअॅप स्टेटसवर ठेवला होता. त्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला. याप्रकरणी उपाध्याय यांना संपर्क साधला असता, त्यांनी हा व्हिडीओ आपलाच असल्याचं मान्य केलं. तसेच आपली चूक झाल्याचं सांगितलं आणि प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी टिटवाळा पोलिसांना विचारलं असता हा प्रकार दिल्लीत घडलेला असून आम्ही बंदुकीच्या परवान्याची पडताळणी करून उपाध्याय याची चौकशी करणार असल्याची माहिती टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.