एक्स्प्लोर
‘हर्बल हुक्का पार्लर' चालकांवर तंबाखूजन्य पदार्थांचे नियम लागू होत नाही, हायकोर्टाचे निर्देश
आमच्या हुक्का पार्लरमध्ये तंबाखूमुक्त हर्बल हुक्का दिला जातो, यामध्ये ग्लिसरीन आणि साखरयुक्त पदार्थ असतात. त्यामुळे आमच्यावर कायद्यानं कारवाई करता येणार नाही, असा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयाने ग्राह्य धरला.

मुंबई : तंबाखूमुक्त (हर्बल) हुक्का पार्लरसाठी आता तंबाखूजन्य पदार्थांसाठीचे नियम लागू होत नाहीत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे हर्बल हुक्का पार्लर चालविणाऱ्या रेस्टॉरंट चालकांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तेव्हा आता हर्बल हुक्का पार्लर सुरु करण्याला एकप्रकारे परवानगीच मिळाली आहे. 'शीशा' या ब्रॅण्डची याचिकाकर्त्यांची तीन रेस्टॉरंट आहेत. या ठिकाणी चारशेहून अधिक कर्मचारी काम करतात. मात्र दोन वर्षांपूर्वी कमला मिल परिसरात लागलेल्या आगीमुळे राज्य सरकारने कायद्यामध्ये सुधारणा केली आणि सरसकट हुक्का पार्लरवर बंदी आणली होती. याविरोधात रेस्टॉरंट चालक अली रेझा आब्दी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. हुक्कापार्लरबाबत अद्याप राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे निश्चित केलेली नाहीत. त्यामुळे ते कोणत्या आधारावर कारवाई करतात?, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता. आमच्या हुक्का पार्लरमध्ये तंबाखूमुक्त हर्बल हुक्का दिला जातो, यामध्ये ग्लिसरीन आणि साखरयुक्त पदार्थ असतात. त्यामुळे आमच्यावर कायद्यानं कारवाई करता येणार नाही, असा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयाने ग्राह्य धरला. याचिकादार हर्बल हुक्का पार्लर चालवू शकतात, मात्र त्यांनी जर तिथं तंबाखूजन्य पदार्थ लोकांना दिले तर त्यांच्यावर प्रशासन कारवाई करु शकते, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
पुणे
क्रिकेट























