(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Gujarati Board : 'मारू घाटकोपर' फलक तोडफोड प्रकरणी ठाकरे गटाच्या तीन शिवसैनिकांना अटक
Ghatkopar Gujarati Board : भाजपने दिलेल्या निवदेनानंतर मुंबई महापालिकेने 'मारू घाटकोपर' या गुजराती फलकाच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती.
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर येथील गुजराती भाषेत असलेले मारू घाटकोपर (Maru Ghatkopar) या फलकाची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) तीन शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने (BMC) पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पंतनगर पोलीस ठाण्याने बुधवारी कारवाई केली. त्यांची कोर्टाने जामिनावर सुटका केली.
घाटकोपरमधील एका उद्यानाजवळील चौकाला लावण्यात आलेला गुजराती फलकाची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती. या गुजरातीमधील तोडफोडीमुळे मराठी गुजराती नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीनंतर भाजपने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर घाटकोपर पूर्वमधील आर बी मेहता मार्गावरील गुजराती नामफलक फोडल्याने भाजप आक्रमक झाली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट कारवाईची मागणी केली होती. भाजपने या तोडफोडीविरोधात निदर्शनेही केली होती.
भाजपने दिलेल्या निवदेनानंतर मुंबई महापालिकेने मारू घाटकोपर या गुजराती फलकाच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर पंतनगर पोलिसांनी ठाकरे गटाच्या तीन शिवसैनिकांना अटक केली. अजित गुजर , हृदयनाथ राणे आणि जितेंद्र परब अशी अटक केलेल्या शिवसैनिकांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात भादंवि 427 आणि सार्वजनिक मालमत्ता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'मारू घाटकोपर'च्या तोडफोडीवर भाजपने काय म्हटले?
भाजपचे मु्ंबई सचिव, माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी म्हटले की, 2016 मध्ये मी नगरसेवक असताना हवेली पूल जवळ सदर चौक बांधण्यात आले आणी सदर चौकाच्या एका बाजूला मराठीत "माझे घाटकोपर" दुसऱ्या बाजूला इंग्रजीत "My Ghatkopar" आणि तिसऱ्या बाजूला गुजरातीमध्ये "मारू घाटकोपर" आणि चौकाच्या मध्यभागी मराठी मध्ये आपले स्वागत आहे असे लिहिले होते. "The world is one family"असे लिहून सदर चौक व संपूर्ण परिसर माझ्या नगरसेवक निधीतून सुशोभीत करण्याला आले. आज ह्या गोष्टीला आठ वर्ष होत आले. आजपर्यंत एक ही तक्रार कोणीही केली नाही. अचानक सदर चौकावरील गुजरातीत लिहलले "मारू घाटकोपर" हा बोर्ड काही शिवसेनेचे कार्यकर्तांनी शनिवारी रात्री तोडले. ठाकरे गट आणि मनसेमध्ये मराठीच्या मुद्यावरून चढाओढ सुरू आहे. त्याच्या परिणामी अशा घटना घडत आहेत. गुजराती सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे गुजराती पाट्यांची तोडफोड सुरू असल्याचा आरोप छेडा यांनी केला.