(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिव्यांगासाठी राज्यातील पहिले कोविड-19 रूग्णालय; नवी मुंबई मनपाकडून अभिनव उपक्रम
नवी मुंबईत दिव्यांग लोकांसाठी कोविड-19 रुग्णालयाची सुरुवात करण्यात आली आहे. सिवूड येथील खाजगी रूग्णालयाच्या माध्यमातून हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु केला आहे.
नवी मुंबई : दिव्यांग रुग्णांची विशेष खबरदारी घेण्यासाठी आणि त्यांच्यावर योग्य रित्या उपचार करण्यासाठी नवी मुंबई मनपाच्या माध्यमातून दिव्यांग कोविड-19 रूग्णालयाची सुरवात करण्यात आली आहे. सिवूड येथील खाजगी रूग्णालयाच्या माध्यमातून हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम महानगरपालिकेने सुरु केला असल्याने दिव्यांग लोकांना चांगलाच आधार मिळाला आहे. दिव्यांगांसाठी या रूग्णालयात अद्यावत अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. रुग्णांवर त्यांच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेवून सीसीसी, डीसीएससी, डीसीएच अशा तीन स्तरावर उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशाच प्रकारे दिव्यांग व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास अशा पॉझिटिव्ह दिव्यांग व्यक्तिंसाठी विशेष उपचार सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला आहे. त्यासाठी सिवूड नेरूळ येथील न्युरोजन ब्रेन अॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूट या रूग्णालयातील 75 बेड्सपैकी 25 बेड्स कोरोनाबाधित दिव्यांग व्यक्तींच्या उपचारासाठी राखीव ठेवल्या आहेत. दिव्यांगासाठीचे महाराष्ट्रातील हे पहिले स्पेशल कोविड हॉस्पिटल कार्यान्वित झाले आहे.
दिव्यांगांच्या सर्व अडचणींचा विचार करून त्यांना हालचाल करणे सुलभ जावे अशा प्रकारे विशेष खोल्यांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे. व्हिलचेअर, दिव्यांगांना वापरण्यास सोयीची अशी स्वच्छतागृहे आहेत. आँटिझम, सेरिब्रल पाल्सीसारखे आजार, इंटेक्च्युअल डिसँबिलीटीचा विचार करून व्यवस्था करण्यात आली आहे. या रूग्णालयामध्ये आँक्सीजन सपोर्ट, व्हेंटिलेटर, इंटेसिव्ह केअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच बरोबर दिव्यांगांवरील उपचाराचा विचार करून वैद्यकीय क्षेत्रातील अद्यावत उपचार पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे.
एकाच छताखाली विविध प्रकारच्या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण आणि सेवा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या इटीसी केंद्राद्वारे नवी मुंबई महानगरपालिकेचा लौकिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असताना विशेष विचार करून अशाप्रकारे कोविड 19 बाधित दिव्यांगांसाठी हॉस्पिटल सुरु करून सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनपा हॉस्पीटल आणि खाजगी हॉस्पीटल मिळून 6000 बेडची व्यवस्था केली आहे. वाशीतील सिडको एक्सिबिशन सेंटरमध्ये 1200 बेडचं कोरोना रूग्णालय उभं करण्यात आलं आहे. 1300 ऑक्सिजन बेड्स, 225 व्हेंटिलेटर, 125 आयसीयू बेड्सची उभारणी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
ठाण्यातील सोसायट्यांना वृत्तपत्र नकोच, वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनची पोलिसांकडे धाव गणोशोत्सवाबाबत सरकारचा निर्णय मान्य असेल, मुबंईतील गणोशोत्सव मंडळांची भूमिका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद गरजू नाट्यकर्मीना करणार 1 कोटी 20 लाखांची मदत लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जी बिस्किटांची जबरदस्त विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला!